Corona Cases Today : देशात कोरोनानं (Corona Update) पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केलं आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या दैनंदिन संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या आकड्यांनी पुन्हा एकदा देशाची चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाच्या 3,303 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या आकड्यासह देशातील सध्याची सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 16 हजार 980 वर पोहोचली आहे. 


गेल्या काही दिवसांपासून देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळत होतं. परंतु, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांसोबतच पॉझिटिव्हिटी दरही वाढल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या देशाचा पॉझिटिव्हिटी दर वाढून 0.66 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2563 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात आतापर्यंत एकूण 4 कोटी 25 लाख 28 हजार 126 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर, आतापर्यंत 5 लाख 23 हजार 693 रुग्णांनी कोरोनामुळं जीव गमावला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 39 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. 





राज्यात बुधवारी 186 कोरोना रुग्णांची नोंद तर 174 कोरोनामुक्त


राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ उतार होताना दिसत आहेत. बुधवारी राज्यात 186 रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्यादेखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 955 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच, गेल्या चोवीस तासांत एकाही कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. राज्यात गेल्या 24 तासांत 174  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


राजधानीत फोफावतोय कोरोना


राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. दिवसागणिक दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकड्यात झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत बुधवारी कोरोनाच्या 1,367 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सध्या दिल्लीत 4800 कोरोनाचे रुग्ण आहेत. यापूर्वी 6 फेब्रुवारी रोजी दिल्लीत 1,410 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 


कोरोना अजून संपलेला नाही, काळजी घेणे आवश्यक : मुख्यमंत्री 


कोरोना अजून संपलेला नाही, जगभरात त्याचे नवनवीन विषाणू जन्माला येत आहेत. चीनमध्ये 40 कोटी जनता सध्या टाळेबंदीमध्ये आहे. आपणही कोविडच्या तीन लाटांचा यशस्वीपणे मुकाबला केला असला तरी आपल्या काही आप्तस्वकीयांना गमावले आहे, यासाठीच्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली, अनेकांचे रोजगार या काळात गेले. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला कोविड अनुकूल वर्तणूक अंगीकारणे आवश्यक आहे. राज्यात आपण या तीन लाटांच्या काळात सुरु केलेल्या आरोग्य सुविधा बंद केल्या नसल्या तरी त्या वापरण्याची वेळ आपल्यावर येऊ नये अशी आपली प्रार्थना असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.