चेन्नई : कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा नव्या रुग्णांची झपाट्यानं वाढ होई लागली असल्यामुळं आता संपूर्ण देशात पुन्हा एकदा सतर्कतेच्या दृष्टीनं काही महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लावण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा ई- पासची अटही लागू करण्यात आली आहे.


तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता हा निर्णय पुन्हा एकदा लागू करण्यात आला आहे. तामिळनाडू राज्य प्रशासनाकडून राज्यातील प्रवास नियमांमध्ये पुन्हा एकदा काही कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ज्याअंतर्गत आंतरराष्ट्रीय प्रवास करुन आलेल्या आणि स्थानिक प्रवास करणाऱ्यांनाही ही अट लागू असणार आहे.


कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केंद्रशासित पुदुच्चेरी येथून येणाऱ्यांसाठी मात्र हे नियम शिथील असणार आहेत. राज्य शासनाकडून राज्यात येणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या या ई- पासमुळं कोणीही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यास त्या व्यक्तीपासून सुरु झालेली संसर्ग साखळी ओळखत कोरोनाच्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यास मदत होणार आहे.


आजही सोन्याचे दर कमीच, जाणून घ्या का सातत्याने कमी होतेय सोन्याची किंमत


राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ई- पासची अट या महिन्याच्या सुरुवातीपासूनच लागू करण्यात आली आहे. सर्व आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक प्रवाशांना ही अट लागू असेल. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि पुदुच्चेरी वगळता इतर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतून येणाऱ्यांसाठी हा नियम बंधनकारक असेल. त्यामुळं देशातील या भागात जायच्या विचारात असाल, तर एकदा ई- पास नक्कीच काढा.