National Emblem : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 जुलै रोजी नवीन संसदेच्या इमारतीवरील राष्ट्रीय प्रतिक अशोक स्तंभाचे (National Emblem Ashok Stambh) अनावरण करण्यात आले. मात्र, या अशोक स्तंभावर असलेल्या सिंहाच्या चेहऱ्यावरील भावमुद्रेवरून (Ashok Stambh) वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर अशोक स्तंभावरून टीकेची झोड उठवली जात आहे. अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
नवीन संसद इमारतीवरील अशोक स्तंभाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी विरोधी पक्षाांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. याबद्दलही आक्षेप घेण्यात आला आहे. भारताचे राष्ट्रीय प्रतिक असलेल्या अशोक स्तंभावरील सिंहाची भावमुद्रा ही शांत, संयमी असल्याचे दिसते. तर, नवीन मुद्रा ही आक्रमक आणि क्रोधित असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी राष्ट्रीय प्रतिक बदलण्यात आला असल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रीय प्रतिक बदलणाऱ्यांना राष्ट्रद्रोही का म्हणू नये असा सवाल त्यांनी ट्वीटवर विचारला आहे.
तर, विचारवंत, लेखक दिलीप मंडल यांनीदेखील नवीन संसद इमारतीवर असलेल्या अशोक स्तंभाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. अशोक स्तंभाचे मूळ स्वरुप सारनाथ येथील संग्रहालयात आहे. राष्ट्रीय प्रतिकाचा फोटो पोस्टाचे तिकिट, सरकारी दस्ताऐवजात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये अशोक स्तंभावरील सिंह हा शांत असलेल्या भावमुद्रेत आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीदेखील राष्ट्रीय प्रतिक असलेल्या अशोक स्तंभाचा एक जुना आणि एक नवीन फोटो ट्वीट केला आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनीदेखील यावर प्रश्न उपस्थित केला आहे. नवीन संसदेच्या इमारतीवर असलेले अशोक स्तंभ हा मोदी व्हर्जन आहे. यामधील सिंहाची भावमुद्रा ही अनावश्यकपणे आक्रमक आहे. याला बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे.
केंद्र सरकारवर अशोक स्तंभाबाबत टीकेची झोड उठत असताना दुसरीकडे सरकारचीही बाजू काही नेटिझन्सने मांडली आहे. अशोक स्तंभावरील फोटो फारच जवळून घेण्यात आल्याने तो आक्रमक वाटत असावा असे म्हटले आहे.
नवीन संसदेच्या इमारतीवर असलेला अशोक स्तंभ 20 फूट उंच असून 9500 किलो वजनाचा आहे. हे अशोक स्तंभ तांब्याचे आहे.