नवी दिल्ली : दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात सुपारी देऊन हिंसा घडवली जात असल्याचा खळबळजनक आरोप समोर आलाय. या प्रकरणात एका युवकाला आंदोलनस्थळी पकडून शेतकऱ्यांनीच पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. त्याची चौकशीही सुरु आहे. पाहूयात काय आहे हा सगळा प्रकार.
दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी खरंच हिंसेंचं षडयंत्र रचलं जातंय? आंदोलनात हिंसा घडवण्यासाठी सुपारी किलर पाठवले जातायत? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. काल आंदोलक शेतकऱ्यांच्या एका नाट्यमय पत्रकार परिषदेनंतर दिल्लीतल्या सिंघु बॉर्डरवर काल आंदोलक शेतकऱ्यांनी एका संशयिताला पकडून माध्यमांसमोर आणलं, आणि नंतर पोलिसांच्या हवाली केलं. शेतकरी आंदोलनात हिंसा घडवण्याच्या कामगिरीसाठी एका पोलिसानं आपल्याला पाठवलं होतं, अशी कथित कबुलीही त्यानं दिली. 26 जानेवारीला शेतकरी ट्रॅक्टर परेड करणार आहेत, त्यात गोंधळ घालण्यासाठी आणि मंचावरच्या 4 शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचाही कट असल्याचा खळबळजनक दावा तरुणानं माध्यमांसमोर केला.
पोलिसांकडून तरुणाची चौकशी
आता या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, याचा शोध पोलीस घेतायत. क्राइम ब्रांचकडूनही त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथामिक माहितीनुसार हा तरुण 21 वर्षांचा आहे. जिथं आंदोलन सुरु आहे तिथून 50 किमी अंतरावरच्या सोनिपत गावचा रहिवाशी आहे. या तरुणाची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीय, त्याच्याकडून कुठली हत्यारंही पोलिसांना सापडलेली नाहीयत. त्यामुळे पोलीस सध्या तरी या षडयंत्राबद्दल काही पुरावे मिळालं नसल्याचं सांगतायत पण पुढची चौकशी सुरु आहे.
शेतकरी आणि सरकारमधली चर्चा कालच पुन्हा अनिश्चिततेच्या वळणावर गेली. कारण कालच्या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांनी निरोपाचीच भाषा केली. नवी तारीखही ठरलेली नाही. सरकारनं दीड वर्षे कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांना दिलेला. पण तोही फेटाळला गेला. अशा स्थितीत या नाट्यमय आरोपानं सरकार आणि शेतकऱ्यांमधलं वातावरण पुन्हा गरम बनलं आहे.
कायदा मागे घेतल्याशिवाय माघार नाही ही शेतकऱ्यांची भूमिका आहे. शिवाय 26 जानेवारीला दिल्लीच्या आऊटर रिंग रोडवर ट्रॅक्टर परेड करण्यावर शेतकरी ठाम आहेत. कुठल्याही परिस्थितीत हा ट्रॅक्टर मोर्चा निघणार हा इशारा त्यांनी दिला आहे. त्यात आता हिंसाचाराचेही आरोप होऊ लागल्यानं पुन्हा तणाव वाढतोय. शेतकरी आंदोलनातला हा सुपारी किलर पाठवण्यामागे नेमकं काय गौडबंगाल आहे, हा दावा कितपत खरा आहे हे आता पुढच्या चौकशीतूनच कळेल.