Congress President Election : काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी (Congress President Election) आज मतदान सुरु झालं आहे. अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि शशी थरुर (Shashi Tharoor) यांच्यात लढत होत आहे. तब्बस 24 वर्षांनंतर काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेसच्या जवळपास 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली जात आहे. 


देशभरातील नऊ हजारांपेक्षा अधिक प्रदेश काँग्रेस समित्यांचे प्रतिनिधी गुप्त मतदान पद्धतीद्वारे पक्षाध्यक्षाची निवड करणार आहेत. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात आणि देशभरातील 65 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर होणार आहे.


1. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिल्ली काँग्रेस मुख्यालयासह देशभरात 65 हून अधिक मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. यामध्ये प्रदेश काँग्रेस समित्यांचे (PCC) प्रतिनिधी मतदान करतील. पीसीसीचे 9,000 हून अधिक प्रतिनिधी गुप्त मतदानाद्वारे पक्षाच्या नवीन अध्यक्षांची निवड करतील. हे प्रतिनिधी दर पाच वर्षांनी पक्षांतर्गत निवडले जातात. काँग्रेस पक्षाच्या इतिहासात सहाव्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे.


2. काँग्रेसचे अध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे अनुक्रमे कर्नाटक आणि केरळ या आपापल्या राज्यात मतदान करतील.


3. काँग्रेसची भारत जोडी यात्रा सध्या कर्नाटकातून जात असल्याने तेथे विशेष मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी बेल्लारीतील संगनकल्लू येथील 'भारत जोडो यात्रा' शिबिराच्या ठिकाणी उभारलेल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत. यात्रेत सहभागी PCC चे 40 प्रतिनिधी देखील त्यांच्यासोबत मतदान करणार आहेत. त्याचवेळी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात उभारलेल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत.


4. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात, सर्व राज्यांचे प्रतिनिधी आपापल्या मतदान केंद्रांवर 'टिक' चिन्हासह मतदान करतील ज्या उमेदवाराला पाठिंबा आहे. याशिवाय, बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याबाबत माहिती देण्यात आली आहे. 


5. मिस्त्री म्हणाले की मतदानानंतर सीलबंद मतपेट्या मंगळवारी (18 ऑक्टोबर) दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या जातील. बुधवारी (19 ऑक्टोबर) मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतपत्रिका एकत्र केल्या जाणार आहे. 50 टक्क्यांहून अधिक मते मिळविणाऱ्या उमेदवाराची काँग्रेस अध्यक्षपदी निवड केली जाईल.


गेहलोत खर्गे यांच्या समर्थनार्थ काय म्हणाले?


काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षाच्या काही नेत्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना उघडपणे पाठिंबा दिला आहे. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा समावेश आहे. गेहलोत म्हणाले की, आपण खर्गे यांचे समर्थक असून त्यांना पाठिंबा देऊन काहीही चुकीचे केले नाही. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊन मोठा त्याग केला आहे, गांधी घराण्यातील कोणीही अध्यक्ष होणार नाही, हे सांगण्यासाठी हिंमत लागते, असेही गेहलोत म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या