भोपाळ : पोलिसांनी राजस्थान सीमेवर अडवल्यानंतर बाईकवरुन मध्य प्रदेसच्या मंदसौरमध्ये निघालेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळलं आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी निघालेल्या राहुल गांधींना राजस्थान सीमेवर अडवण्यात आलं. परंतु पोलिसांना गुंगारा देत राहुल गांधी तिथल्या एका बाईकवरुन निघून गेले.

राहुल गांधी निम्बाडाजवळ बाईकवर स्वार होऊन मंदसौरच्या दिशेने निघून गेले.

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं मंदसौरमध्ये आंदोलन सुरु होतं. यावेळी पोलिसांच्या गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आज सकाळी राजस्थानमार्गे मध्य प्रदेशात पोहोचले. मात्र पोलिस अधीक्षकांनी राहुल गांधींना तणावग्रस्त मंदसौर जिल्ह्यात प्रवेशबंदी केली.



पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांची हत्या झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. शिवाय या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौनावरही प्रश्न उपस्थित केला आहे.

त्यानंतर आज राहुल गांधी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी घटनास्थळी जात होते. पण पोलिसांनी घटनास्थळी जाण्यापासून रोखल्याने राहुल गांधी आमदार जीतू पटवारी यांच्या बाईकवर बसून निघून गेले.

त्यांच्यासोबत कमलनाथ, सचिन पायलही बाईकवरुन मध्य प्रदेशकडे रवाना झाले. मध्य प्रदेश पोलिसांना चकवा देत, त्यांनी अखेरच्या क्षण प्लॅन बदलून, कारमधून उतरुन बाईकने छोट्या रस्त्याने निघून गेले.

मंदसौरच्या कलेक्टर, पोलिस अधीक्षकांची बदली
दरम्यान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंदसौरचे जिल्हाधिकारी स्वतंत्र सिंह आणि पोलिस अधीक्षक ओपी त्रिपाठी यांची बदली केली आहे. स्वतंत्र कुमार सिंह यांची बदली मंत्रालयात उपसचिवपदी केली आहे. तर सिंह यांच्या जागी ओपी श्रीवास्तव यांची जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे.

तसंच सरकारने मंदसौरचे पोलिस अधीक्षक ओपी त्रिपाठी यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मनोज कुमार सिंह यांची नियुक्ती केली आहे.

पाहा व्हिडीओ