नवी दिल्ली : काँग्रेसने 55 वर्षांहून अधिक काळ देशावर सत्ता गाजवली. या कार्यकाळात काँग्रेसच्या सरकारने जवानांना नेहमीच दुय्यम दर्जा देत दुबळं करण्याचा प्रयत्न केला. संरक्षण खात्याशी संबधित एकही व्यवहार काँग्रेसने दलालीशिवाय केला नाही. असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी आज केला.

नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत शेवटचे भाषण केले. या भाषणात त्यांनी गेल्या साडेचार वर्षात सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. मोदी म्हणाले की, "काँग्रेस सरकारने त्यांच्या 55 वर्षांचा कार्यकाळात आपल्या सैनिकांना मुलभूत वस्तूदेखील पुरवल्या नाहीत."

मोदी म्हणाले की, "2009 साली भारतीय लष्कराने सरकारकडे बुलेटप्रूफ जॅकेट आणि हेल्मेट्सची मागणी केली होती. परंतु काँग्रेस सरकारने ती मागणी मान्य केली नाही. बुलेटप्रूफ जॅकेटसह चांगले हेल्मेट, चांगले बूटदेखील दिले नाहीत. परंतु 2016 साली आम्ही भारतीय लष्करासाठी 50 हजार आणि 2017 मध्ये 1 लाख 86 हजार बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी केले."

काँग्रेसने आपल्या जवानांना गरजेचे साहित्य आणि शस्त्रसामग्रीदेखील पुरवली नाही. त्यामुळे ते सरकार सर्जिकल स्ट्राईकचा विचारही करु शकत नव्हतं. देशाची वायुसेना दुबळी व्हावी ही काँग्रेसची इच्छा आहे. त्यामुळे काँग्रेसने संरक्षण विभागाशी संबधित व्यवहारांमध्ये घोटाळे केले, जवानांना शस्त्रसामग्री पुरवली नाही.