संदीप दीक्षित यांनी रविवारी लष्कर प्रमुखांना रस्त्यावरचे गुंड असं म्हणलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आज दिवसभर राजकीय पडसाद उमटत आहेत. भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवत, या प्रकरणी सोनिया गांधींनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. त्यावर राहुल गांधींनी पुढाकार घेत संदीप दीक्षित यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हणलं आहे.
काय म्हणाले संदीप दीक्षित?
संदीप दीक्षित यांनी रविवारी, ''पाकिस्तान सातत्यानं कुरापती काढतंय, चिथवणीखोर वक्तव्यं करतंय. पण आपले लष्करप्रमुख रस्त्यावरील गुंडाप्रमाणे वक्तव्यं देत असल्याचं पाहून दु:ख होतं. हेच पाकिस्तानकडून होत असल्यास त्यावर आश्चर्य वाटत नाही.''
राहुल गांधींनी संदीप दीक्षित यांच्या या वक्तव्यावर खेद व्यक्त करताना, आपलं लष्कर देशाची संरक्षण करतं. तेव्हा त्यांच्यावर अशाप्रकारची कोणीही टीप्पणी करु नये, असा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजवाल यांनीही संदीप दीक्षित यांनी संयमाने बोलण्यास सांगितलं आहे.
दुसरीकडे, संदीप दीक्षित यांच्या वक्तव्यावरुन भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दीक्षित यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे नेते भारताच्या लष्कर प्रमुखांचा उल्लेख रस्त्यावरचे गुंड म्हणून कसा काय करु शकतं? असा सवाल केला आहे.
तर भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी संदीप दीक्षित यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राव यांनी ट्वीट करुन, ''संदीप दीक्षित काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते आहेत. काँग्रेसकडून भारतीय लष्कराचा सतत्यानं आपमान केला जात आहे. ते पाकिस्तान आणि आयएसआयचे समर्थक आहेत का?'' असा सवाल उपस्थीत केला आहे.
दरम्यान, संदीप दीक्षित यांनी आपल्या वक्तव्यावर मागे घेऊन जाहीर माफी मागितली आहे. पण राजकारणात चमकेगिरीसाठी संदीप दीक्षित सारखे नेते लष्काराच्या नावाचा वापर करत आहेत का? असा सवाल उपस्थीत होत आहे.