नवी दिल्ली: लोकसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या तिन्ही जागांवरील कल स्पष्ट होत असून भाजप दोन जागांवर पराभवाच्या छायेत आहे. काँग्रेसने यावर प्रतिक्रिया व्यक्त केली असून मोदींनी हट्ट सोडून तीन कृषी कायदे मागे घेण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करून ही मागणी केली आहे.
सुरजेवाला यांनी म्हटले की, लोकसभा पोटनिवडणुकीतील तीन जागांपैकी दोन जागांवर भाजपचा पराभव निश्चित आहे. तर, विधानसभा पोटनिवडणुकीत हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत झाली. या ठिकाणीही भाजपचा पराभव होत असल्याचे त्यांनी म्हटले. सुरजेवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हट्ट सोडून तिन्ही काळे कायदे मागे घेण्याची मागणी केली. त्याशिवाय, पेट्रोल-डिझेल-गॅसची दरवाढ करून लूट करणे बंद करण्याची मागणी केली आहे.
हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा जागेवरील पोटनिवडणुकीत काँग्रेस आघाडीवर आहे. तर, विधानसभेच्या जुब्बल-कोटखाई आणि अर्की या जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर, फत्तेहपूर विधानसभेच्या जागेवर भाजपने आघाडी घेतली आहे.
राजस्थानमधील धरियावद विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार नगराज मीणा यांचा विजय झाला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार थावरचंद यांचा 18 हजाक 725 च्या मताधिक्याने पराभव केला. तर, वल्लभनगर जागेवर काँग्रेस उमेदवार प्रीति सिंह शक्तावत आघाडीवर आहेत.
आसाममधील विधानसभा पोटनिवडणुकीच्या पाचही जागांवर भाजप नेतृत्वातील एनडीएने दमदार विजयाच्या वाटचाल सुरू केली आहे. भाजप उमेदवार फणीधर तालुकदार. रुपज्योती कुर्मी आणि सुशांता बोरगोहन आघाडीवर आहेत.
पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या चार जागांवर मतदान झाले होते. या चारही जागांवर ममता बॅनर्जी यांच्या तृणमृण काँग्रेसने विजयी आघाडी घेतली आहे. दिनहाटामध्ये तृणमृल काँग्रेसच्या उदयन गुहा यांनी एक लाख ६३ हजार मतांनी विजय नोंदवला.