नवी दिल्ली : दिल्ली दंगलीसंदर्भात दिल्ली विधानसभेच्या समितीसमोर फेसबुक इंडियाच्या हजेरीप्रकरणी कंपनीला आणखी थोडा वेळ मिळाला आहे. फेसबुक इंडियाने दिल्ली विधानसभेच्या समितीसमोर हजर राहण्यासाठी 14 दिवसांचा अवधी मागितला होता. ज्याला मान्यता देण्यात आली आणि आता फेसबुक इंडियाला समितीसमोर हजर राहण्यासाठी 18 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे.


फेसबुक इंडियाला 27 ऑक्टोबरपर्यंत हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते
विशेष म्हणजे, दिल्ली दंगलीप्रकरणी दिल्ली विधानसभेच्या पीस अँड हार्मनी कमिटीने फेसबुक इंडियाला 27 ऑक्टोबरपर्यंत हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. त्यानंतर फेसबुकने ईमेलद्वारे दिल्ली विधानसभेच्या समितीकडे 14 दिवसांचा वेळ मागितला होता. समितीसमोर हजर राहून निवेदन देण्यासाठी योग्य अधिकाऱ्यांची निवड करत असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. फेसबुकचे हे आवाहन स्वीकारून समितीचे अध्यक्ष राघव चढ्ढा यांनी आता फेसबुकला 18 नोव्हेंबरपर्यंत रोजी दुपारी 12.30 वाजता समितीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.



फेसबुकच्या समन्सविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती
त्याचवेळी दिल्ली विधानसभेच्या पीस अँड हार्मनी कमिटीच्या वतीने फेसबुक इंडियाने जारी केलेल्या समन्सला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परंतु, ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली होती. सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की दिल्ली विधानसभेच्या पीस अँड हार्मनी कमिटीला आपल्या विशेषाधिकाराखाली बाहेरील लोकांसमोर हजर राहण्यासाठी समन्स जारी करण्याचा अधिकार आहे.


दिल्ली दंगलीत 53 जणांचा मृत्यू
नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सीएएच्या समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर 24 फेब्रुवारी रोजी ईशान्य दिल्लीत दंगल भडकली होती. यामध्ये 53 जणांचा मृत्यू झाला होता तर जवळपास 200 जण जखमी झाले होते.


दंगलीत सामील सर्व जणाच्या भूमिकांचाही तपास : दिल्ली पोलीस
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, "फेब्रुवारीमध्ये ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगलीत सामील सगळ्यांच्या भूमिकांचा तपास सुरु आहे, ज्यांचा हिंसा पसरवण्याच्या कटात सहभाग होता. तसंच समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते."