Rahul Gandhi On Agusta Westland: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने ऑगस्टा वेस्टलँड मालकीची कंपनी फिनमेकानिकासोबतच्या व्यवहारावरील निर्बंध हटवले असल्याचे वृत्त समोर आले. त्यावरून काँग्रेसने भाजपवर टीका केली. मोदी सरकार आणि फिनमेकानिका दरम्यान गुप्त करार झाला आहे का, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे. भारत सरकारने 12 व्हीआयपी हेलिकॉप्टरच्या खरेदीशी निगडीत असलेल्या करार, अटींचे उल्लंघन आणि लाचखोरीच्या आरोपांवरून फिनमेकानिकाची ब्रिटीश कंपनी ऑगस्ट वेस्टलँडसोबतचा करार संपुष्टात आणला होता.  


राहुल गांधींची खोचक टीका


भाजपने काँग्रेसवर व्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीच्या मुद्यावर टीका केली होती. काँग्रेस नेत्यांनी ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून 450 कोटी रुपयांची कथित लाच स्वीकारली असल्याचा आरोप भाजपने केला होता. भाजपने या मुद्यावर काँग्रेसविरोधात रान उठवले होते. आता फिनमेकानिका कंपनीसोबत खरेदी करारावर लावलेले निर्बंध हटवल्याच्या वृत्तानंतर राहुल गांधी यांनी खोचक टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले की, याआधी ऑगस्टा भ्रष्ट होता. आता भाजपच्या लाँड्रित धुवून स्वच्छ झाला आहे. 






रणदीप सुरजेवाला यांचे केंद्राला प्रश्न 


काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट करून म्हटले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान, मोदी सरकारकडून काही बनावट दस्ताऐवज लीक करण्यात आले. त्यातून युपीए सरकारविरोधात खोट्या गोष्टी पेरण्यासाठी हजारो तास वाया घालवले. युपीए सरकारवर आरोप करणारे मोदी सरकार आणि ऑगस्टा/फिनमेकेनिका दरम्यान झालेल्या गुप्त सौद्यावर प्रश्न उपस्थित करतील का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 







व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणाशी संबंधित असलेली इटलीतील कंपनी लिओनार्डोवरील (आधीचे नाव फिनमेकेनिका) केंद्र सरकारने बंदी हटवली आहे. ही बंदी हटवल्यामुळे भारत सरकार आता लिओनार्डो कंपनीकडून शस्त्र आणि लष्करी उपकरण खरेदी करण्यासाठी नवीन करार करू शकतात. काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने अंशत: बंदी हटवली होती.