Goa Polls 2022: नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा बाजी मारत 20 जागा जिंकल्या. मात्र सर्वाधिक जागा जिंकल्यानंतरही भाजपने अद्याप गोव्यात सत्तास्थापनेचा दावा केला नाही. सत्तास्थापनेसाठी भाजपकडून होत असलेल्या विलंबावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. गोव्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर काम यांनी भाजपला मिळालेल्या समर्थनावरही प्रश्न उपस्थित केला आहे. भाजपला गोव्यात खरेच अपक्ष आमि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे समर्थन मिळालेय का? असा सवाल केला आहे. तर काँग्रेसचे नेता कार्लोस फरेरा यांनी तर गोव्यात भाजप सरकार बनवण्यात अपयशी ठरत असेल तर दुसऱ्या क्रमांकाच्या पार्टीला संधी द्यावी, असे म्हटलेय. 


संधी मिळाल्यानंतर काँग्रेस सत्ता स्थापन करु शकेल का? काँग्रेसला अपक्ष आमदार आणि इतर पक्षाचा पाठिंबा आहे का? असा प्रश्न दिंगबर कामत यांना विचारला. यावर बोलताना कामत म्हणाले की, 'अपक्ष आणि पक्षांसोबत चर्चा सुरु आहे. गोव्यात काहीही होऊ शकते.' दिगंबर कामत म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब न झाल्यामुळे भाजपमधील अंतर्गत कलह समोर आलाय. किंवा भाजपला अपक्ष अथवा इतर पक्षाचा पाठिंबा नाही, त्यामुळे भाजप सरकार स्थापन करण्यास उशीर करत आहे. 
 
काँग्रेस पार्टीचे दुसरे नेता कार्लोस फरेरा म्हणाले की, राज्यपाल आपल्या संवैधानिक जबाबदारीने वागत नाहीत. गोव्यात याआधी कधीही सत्ता स्थापनेपूर्वी आमदारांचा शपथविधी झाला नाही. सर्वाधिक जागा मिळालेला पक्ष सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरत असेल तर दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला संधी देण्याचं काम राज्यपालांचं आहे. पण अद्याप राज्यपालांनी मौन बाळगले आहे. 


गोवा विधानसभेच्या 39 नवनिर्वाचित सदस्यांनी मंगळवारी शपथ घेतली. नवीन सदस्यांना शपथ देण्यासाठी राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी मंगळवारी विधानसभेचे अधिवेशन बोलावले होते. श्रीधरन यांनी विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी सोमवारी नवनिर्वाचित आमदार गणेश गावकर यांना हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली. 40 सदस्यीय गोवा विधानसभेसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान झाले आणि 10 मार्च रोजी निकाल जाहीर झाला.