नवी दिल्ली : व्हॉट्सअॅप हेरगिरीप्रकरणी काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली की, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना व्हॉट्सअॅपकडून हेरगिरीसंबंधी एक मेसेज आला आहे. जे फोन हॅक करण्यात आले होते, त्या फोन नंबर्सवर व्हॉट्सअॅपने जे मेसेज पाठवले आहेत, तसा मेसेज प्रियांका गांधी यांनाही आला आहे. त्यामुळे प्रियांका गांधी यांच्या फोन डेटाची हेरगिरी झाल्याचा संशय काँग्रेसने व्यक्त केला आहे. मोदी सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले पाहिजेत आणि याबाबत कडक कारवाई होणे गरजेचं आहे, अंस सुरजेवाला यांनी म्हटलं.


सुरजेवाला यांनी पुढे म्हटलं की, सरकार विरोधी पक्षावर नजर ठेवून राजकीय माहिती मिळवण्याचं काम करत आहे का? तसं असेल तर हा मोठा गुन्हा आहे. भाजप सरकार आणि त्यांची यंत्रणा इस्राईलची कंपनी एनएसओचं एक सॉफ्टवेअर वापरुन राजकीय नेते, पत्रकार, विचारवंत, शिक्षण तज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते यांचे फोन हॅक करत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.





भाजपला हेरगिरी करणारा पक्ष म्हटत सुरजेवाला यांनी म्हटलं की, 2019 लोकसभा निवडणुकीदरम्यान पिगेसस स्पायवेअरच्या साहाय्याने फोन टॅप करण्यात आले आणि याची माहिती व्हॉट्सअॅपने सरकारला दिली होती. सरकारला मे 2019 पासून याची माहिती होती. इस्राईलच्या एका कंपनीकडून 121 भारतीयांना पिगेसस सॉफ्टवेअरने निशाणा बनवलं जात आहे, अशी माहिती व्हॉट्सअॅपने सरकारला सप्टेंबर महिन्यातच दिली होती, असं सूत्रांकडून कळत आहे. मात्र व्हॉ्टसअॅपकडून मिळालेली माहिती अर्धवट आणि अपुरी होती, असं माहिती व तंत्रज्ञान मंत्रालययाने स्पष्ट केलं आहे.