Congress Protest on Inflation : महागाईच्या विरोधात काँग्रेस (Congress) चांगलीच आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या वतीनं सातत्यानं आवाज उठवला जात आहे. आजपासून काँग्रेसच्या वतीनं महागाईच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी 'महागाई चौपाल' लावण्यात येणार आहे. काँग्रेसच्या वतीनं आज सर्व विधानसभा मतदारसंघातील मंडळे, किरकोळ बाजार आणि इतर ठिकाणी या महागाई चौपाल आंदोलन केलं जाणार आहे.


काँग्रेस आजपासून 23 ऑगस्टपर्यंत या महागाई चौपालांचे आयोजन करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 28 ऑगस्ट रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर या महागाई विरोधातील आंदोलनाची समाप्ती होणार आहे.  'महागाई वर हल्ला बोल' अशी रॅली काढून या आंदोलनाचा समारोप होणार आहे. दरम्यान, नुकतेच काँग्रेसने 5 ऑगस्ट रोजी महागाईच्या मुद्द्यावरुन देशव्यापी आंदोलन केलं होतं. या आंदोलनात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी आपल्या समर्थकांसह दिल्लीच्या संसद भवनापासून राष्ट्रपती भवनापर्यंत महागाईच्या विरोधात काढलेल्या मोर्च्यात सहभागी झाले होते. तेव्हा त्यांना विजय चौकात रोखण्यात आले होते. पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नव्हती. त्याचवेळी काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शने करणाऱ्या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सहा तासांनंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची कोठडीतून सुटका करण्यात आली. प्रदर्शनापूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. भारतातील कोणतीही संस्था स्वतंत्र आणि निःपक्षपाती नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच प्रत्येक संस्था आरएसएसच्या नियंत्रणाखाली असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.


या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. देशात लोकशाहीची हत्या सुरु असून, देशामध्ये चार लोकांची हुकुमशाही सुरु आहे. सध्या देशातील परिस्थिती भयानक आहे. 
काँग्रेसनं (congress) जे 70 वर्षात कमावलं ते भाजपनं (BJP) 7 वर्षात गमावलं असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं होते. आम्ही एका राजकीय पक्षाशी लढत नाहीत तर आम्ही संपूर्ण पायाभूत सुविधांशी लढत आहोत. जर कुणी विरोधकांना पाठिंबा देत असेल तर त्याच्या मागे ईडी आणि सीबीआय लावले जाते. त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसत नसल्याचेही ते म्हणाले होते. अर्थमंत्र्यांना महागाई का दिसत नाही हेच कळत नाही.  ते म्हणतात स्टार्टअप इंडिया आहे, सांगा कुठे आहे स्टार्टअप इंडिया. लोकांना नोकरीवरुन काढलं जात असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हातात सगळी संवादाची साधनं आहेत. जेवढं मी बोलेन, तेवढी माझ्यावर कारवाई केली जाईल. पण मी घाबरत नाही. आता माझ्यावर आणखी हल्ले होतील. जो धमकावतो तो घाबरत असतो. या लोकांना भारताच्या आजच्या परिस्थितीची भीती वाटते. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची त्यांना भीती वाटते, असेही राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले होते.


महागाई दराबाबत रिझर्व्ह बँकेचा अंदाज 


भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अलीकडील अंदाजानुसार, 2022-23 मध्ये महागाई दर 5.7 टक्क्यांवरून 6.7 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. जुलै महिन्यात घाऊक महागाई दरात दिलासा मिळाला होता. महागाईवर आपली पकड असल्याचा दावा मोदी सरकार सातत्याने करत असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: