नवी दिल्ली: काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी आता खिळे लावले असून कडेकोट बंदोबस्त वाढवला आहे. या बंदोबस्ताचा एक व्हिडीओ शेअर करत काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली आहे.


प्रियांका गांधी यांनी 22 सेकंदाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. गाझीपूर सीमेवर सुरक्षा रक्षकांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. त्यामध्ये बॅरिकेट्सचे थर आणि त्यावर काटेरी तारांचे कुंपन दिसत आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना प्रियांका गांधींनी एक कॅप्शन टाकलंय, "पंतप्रधानजी, आपल्याच शेतकऱ्यांशी युद्ध?"






या आधीही प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी सहा पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. त्या प्रश्नावरुनही प्रियांका गांधी यांनी टीका केली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे.


मोदी सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय, पण.... प्रियांका गांधींचा हल्लाबोल


राहुल गांधी यांनी दिल्लीतील सीमांवर पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईवर आणि सुरक्षेच्या गोष्टीवर टीका केली आहे. त्यांनी या संबंधित काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये त्यांनी लिहलंय की, "भारत सरकार, पुल बांधा- भिंती उभा करु नका."






प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान मोठा हिंसाचार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. आता या हिंसाचाराचा तपास दिल्ली सरकारची क्राईम ब्रँन्च करणार आहे.


दिल्लीतील हिंसाचाराची दखल घेऊन आता दिल्ली पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी दिल्लीच्या सीमेवरती कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्यासाठी दिल्लीच्या सीमेवरती खिळ्यांचा वेढा करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही टीका केली आहे.


Farmer Protest : दिल्ली सीमेवर असलेला खिळ्यांचा वेढा हा भारत-चीन सीमेवर हवा होता, संजय राऊतांचा केंद्र सरकारला टोला