नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि तेहलकाचा संपादक तरुण तेजपालबाबत एक नवा खुलासा समोर आला आहे. टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने याबाबतचा खुलासा केला आहे. तरुण तेजपालला सोडवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी तत्कालिन अर्थमंत्री पी.चिदमबरम यांना पत्र लिहिल्या दावा टाईम्स नाऊने केला आहे.


टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, 2004 मध्ये तहलका न्यूज पोर्टलच्या फायनान्स प्रायव्हेट फर्म फर्स्ट ग्लोबलच्या विरोधातील तपासासंदर्भात खुद्द सोनिया गांधींनी पी.चिदंबरम यांना पत्र लिहलं होतं. या पत्राद्वारे तपास थांबवण्याचे आदेश चिदंबरम् यांना दिले होते. विशेष म्हणजे, सोनिया गांधींच्या पत्रानंतर फर्स्ट ग्लोबलच्या व्यवहारांचा तपास करणाऱ्या समितीला तत्काळ हटवण्यात आलं. तसेच यानंतर सोनिया गांधींनी ईडीच्या तत्कालिन संचालकाला भेटायला बोलावल्याची माहिती टाईम्स नाऊने आपल्या वृत्तात दिली आहे.

सोनिया गांधींनी चिदंबरम यांना दिलेल्या आदेशानुसार, तेहलका प्रकरण सोडवण्यासाठी प्राथमिकता द्यावी. ज्यातून या प्रकरणात कोणते आर्थिक गैरव्यवहार झाले आहेत, हे निश्चित केले जाऊ शकेल. सोनिया गांधींच्या या पत्रानंतर यूपीए सरकारने ग्रुप ऑफ मिनिस्टरची स्थापना करुन, दोन दिवसातच यासाठी नेमलेल्या तपास समितीला हटवलं होतं.

विशेष म्हणजे, त्याच काळात तेहलकामधून गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बातम्या दिल्या जात होत्या. सोनिया गांधी आणि पी. चिदंबरम यांचा पत्रव्यवहार समोर आल्यानंतर, चिदंबरम यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. चिदंबरम् यांनी हे पत्र अतिशय योग्य असल्याचं सांगून, याबाबतचा तपास माझ्या खात्याचा अख्यत्यारित येत असल्याने, मी त्याला उत्तर दिलं असेल, अशी शक्यताही व्यक्त केली आहे.

चिदंबरम म्हणाले की, “सोनिया गांधींचं पत्र आणि त्याला मी दिलेलं उत्तर हे जनतेसमोर आलं पाहिजे. त्यामुळे या प्रकरणातील सोनिया गांधींच्या पत्राला मी दिलेल्या उत्तराची प्रत सार्वजनिक करावी, अशी मीडियाला मी विनंती करतो.”

दरम्यान, याप्रकरणी भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी यूपीए सरकारच्या कृष्णकृत्याचा हा ढळढळीत पुरावा असल्याचं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

बलात्कार प्रकरणी तरुण तेजपाल यांच्याविरोधातील आरोपपत्र सादर