लखनऊ : काही दिवसांपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या अमेठी मतदारसंघात ते हरवल्याचे पोस्टर लावल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता सोनिया गांधीच्या रायबरेली मतदारसंघातही असाच प्रकार उघडकीस आला आहे. सोनिया गांधींच्या मतदारसंघात त्या हरवले असल्याचे पोस्टर्स अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत.


रायबरेलीच्या गोरा बाजार, महानंदपूर आणि गव्हर्नमेंट कॉलनी परिसरात अशा प्रकारचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यामध्ये सोनिया गांधींचा पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीस योग्य ते बक्षीस दिलं जाईल, असंही म्हटलंय. तसेच हे पोस्टर रायबरेलीमधील नागरिकांच्या वतीने लावण्यात आल्याचं यात म्हणलं आहे. सोनिया गांधीच्या संदर्भातील हे पोस्टर्स काँग्रेस कार्यकर्त्यांनी तत्काळ हटवले आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या वर्षीच्या सुरुवातीपासून मतदारसंघात फिरकल्या नाहीत. तर दुसरीकडे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही फेब्रुवारीनंतर अमेठी मतदारसंघाचा दौरा केला नाही.

राहुल गांधींनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी अमेठीचा दौरा केला होता. त्यांनी समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासोबत अनेक ठिकाणी रोड शो केला होता. पण सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणूक प्रचारासाठी जाऊ शकल्या नव्हत्या.

दरम्यान, सोनिया गांधींच्या पोस्टर्सप्रकरणी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला जबाबदार धरलं आहे. रायबरेली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष योगेंद्र मिश्रा यांनी, हे पोस्टर्स लावण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे, असा आरोप केला आहे.

संबंधित बातम्या

अमेठीत राहुल गांधी हरवल्याचे पोस्टर, काँग्रेसचा भाजप आणि संघावर हल्लाबोल