लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद तडकाफडकी सोडलं, त्यानंतर पुन्हा सोनिया गांधींना सूत्रं स्वीकारावी लागली. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी हजेरी लावली देखील. पण सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावर पूर्वीपेक्षा कमी झाला होता. मात्र, आता राहुल गांधी यांनी पुन्हा सक्रीय व्हावं यासाठी पक्षाकडूनही वेगवेगळे कार्यक्रम आखल्याचं दिसतं आहे. उद्या म्हणजे 28 जानेवारीला ते जयपूरमध्ये युवा आक्रोश रॅलीला संबोधित करणार आहेत, त्यानंतर 30 तारखेला ते केरळमध्येही सभा घेणार आहेत. शिवाय पुढच्या काही काळात त्यांचे वेगवेगळ्या राज्यांमध्येही दौरे असणार आहेत. त्यामुळे एक प्रकारे काँग्रेसमध्ये राहुल यांचं पुन्हा लाँचिंग करण्याच्याच दृष्टीनं या सगळ्या हालचाली सुरु आहेत. राहुल गांधी ही अध्यक्षपदाची सूत्रं नेमकी कधी स्वीकारणार हे मात्र अद्याप निश्चित नाही. पण या वर्षात कधीही ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते असं काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितलं.
राहुल अध्यक्ष, तर प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात चेहरा -
राहुल गांधी यांची पुन्हा अध्यक्ष बनण्याची चर्चा सुरु असताना, प्रियंका गांधी यांना काँग्रेस उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उतरवेल अशी माहिती काँग्रेसच्या खास सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. 2022 ला उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. राजकीय दृष्टया अत्यंत महत्वाच्या या राज्यात काँग्रेसची स्थिती प्रचंड घसरली आहे. 404 जागांच्या विधानसभेत काँग्रेसला मागच्या निवडणुकीत अवघ्या 7 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रीय पातळीवरही काँग्रेस मजबूत करायची असेल तर उत्तर प्रदेशात पक्षाला पुन्हा प्रभावी व्हावं लागेल. त्याच रणनीतीचा भाग म्हणून प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून काँग्रेस या निवडणुका लढण्याची शक्यता आहे. "आजवर गांधी घराण्यातल्या कुठल्या व्यक्तीनं राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलेलं नाहीय. पण सध्या पक्षाची जी स्थिती आहे ती पाहता कुणीतरी पाय रोवून यूपीत उभं राहिले पाहिजे" अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्यानं दिली. शिवाय राष्ट्रीय पातळीवर एकाचवेळी दोन नेते असताना ही संधी घ्यायला अधिक वाव आहे असंही त्यांनी म्हटलं.
Rahul Gandhi slams Modi-Shah | मोदी-शाहांच्या अजेंड्याला विरोध म्हणजे अर्बन नक्षल, NIA तपासावरुन राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा