येत्या 8 नोव्हेंबरला नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याविरोधात काँग्रेस देशव्यापी आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस महासचिव आणि पदाधिकाऱ्यांची काँग्रेस मुख्यालयात बैठक झाली.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह दिग्गज काँग्रेस नेत्यांची या बैठकीला हजेरी होती. 8 नोव्हेंबरला देशात कशा पद्धतीने आंदोलन करायचं, यावर यावेळी चर्चा करण्यात आली.
भाजप 8 नोव्हेंबर 'काळेधन विरोधी दिन' साजरा करणार
8 नोव्हेंबर 2016… हा दिवस कुणीही विसरु शकत नाही. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि हजारच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला होता. हा दिवस भाजपच्या वतीने देशभरात ‘काळेधन विरोधी दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे.
काळा पैसा बाहेर काढण्याचं लक्ष्य ठेवून केंद्र सरकारने गेल्या वर्षी 8 नोव्हेंबरला नोटाबंदी जाहीर केली होती. एकाचवेळी अर्थव्यवस्थेतील 84 टक्के चलन रद्द करण्यात आलं होतं. या नोटाबंदीनंतर देशभरात अभूतपूर्व चलनतुटवडा निर्माण झाला. आर्थिक व्यवहारांसाठी लोकांना पैसा मिळत नव्हता.
त्यामुळे विरोधकांनी हा काळा दिवस साजरा करण्याचं घोषित केलं होतं. त्याला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर देताना ‘काळेधन विरोधी दिन’ हा दिवस साजरा करणार असल्याचं काही दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं.
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री देशभरात दौरा करणार आहेत. काळा पैसा रोखण्यासाठी सरकारने काय पाऊलं उचलली, याबाबत माहिती मंत्र्यांकडून दिली जाणार आहे, अशी माहिती अरुण जेटलींनी दिली.