नवी दिल्ली : राहुल गांधी यांना तातडीने पक्षाचे अध्यक्ष बनवण्याचा ठराव दिल्ली काँग्रेसने संमत केला. दिल्ली प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल चौधरी म्हणाले की, फक्त राहुल गांधीच कॉंग्रेस कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊ शकतात. शेतकऱ्यांपासून ते जीएसटीपर्यंतचे त्यांचे अंदाज खरे ठरत आहेत. राहुल गांधी यांनी आपली नेतृत्व क्षमता दाखवली आहे. त्यामुळे आम्ही त्यांनी पुन्हा कॉंग्रेस अध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर केला.





दिल्ली काँग्रेसने आपल्या ठरावात काय म्हटलं?


दिल्ली कॉंग्रेस कमिटीने आपल्या प्रस्तावात म्हटले आहे की, देश आज एक कठीण काळातून जात आहे. केंद्रातील मोदी सरकारने एकाच वेळी देशातील लोकशाही, अर्थव्यवस्था, सामाजिक आणि धार्मिक व्यवस्थेवर हल्ला केला आहे. सर्व घटनात्मक संस्था आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत आहेत. वैयक्तिक द्वेष आणि राजकीय विरोधकांना शांत ठेवण्यासाठी या संस्था वापरल्या जात आहेत.


राहुल गांधींनी देशाला नजीकच्या धोक्याबाबत नेहमीच सतर्क केलं आहे. कोरोनाचं संकट असो किंवा लॉकडाऊनचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असो. परंतु सध्याच्या सरकारांनी याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आज देश आर्थिक मंदी, बेरोजगारीसारख्या समस्यांमधून जात आहे, असं प्रस्तावात म्हटलं आहे.


राहुल गांधींनी आपल्या कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या कार्यकाळातही संसदेमध्ये देशाला नोटाबंदी, जीएसटीचे परिणाम आणि सध्याच्या सरकारचा शेतकऱ्यांविषयी धोरणाबाबत इशारा दिला होता. याचा परिणाम म्हणून आज तीन काळे कायदे देशासमोर आहेत, असंही दिल्ली काँग्रेसने म्हटलं आहे.


2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या पदावर कोण बसणार याबद्दल बर्‍याच चर्चा झाल्या. शेवटी सोनिया गांधी यांना पक्षाचे अंतरिम अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, कॉंग्रेस पक्षातील संघटनात्मक निवडणूक मे महिन्यात होऊ शकते. त्यामुळे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, मे महिन्यात काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष बनवण्याची चर्चेची ही पहिलीच वेळ नाही. या अगोदरही बऱ्याच वेळा राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष बनवण्याची मागणी झाली आहे.