Congress News : आजपासून काँग्रेस पक्षाचं शिबिर (Congress Nav Sankalp Chintan Shivir) सुरु झालं आहे. उदयपूरमध्ये तीन दिवस हे शिबीर चालणार आहे. या तीन दिवसीय या शिबिरामध्ये देशभरातील काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत. मात्र या शिबिरामध्ये कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. या शिबिरात विविध समित्यांच्या बैठका पार पडणार आहेत. या समित्यांच्या बैठकांवेळी प्रत्येकाला आपापले मोबाईल बाहेर लॉकअपमध्ये ठेवून जायला सांगण्यात आलं आहे. 


काँग्रेस शिबिरात नेत्यांसाठी महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिबिरामध्ये 6 विषयांवर चर्चा करण्यासाठी समित्या नेमलेल्या आहेत. समितीच्या बैठकीसाठी हॉलमधे जाताना प्रत्येकाने आपला मोबाईल बाहेर लॉकअपमध्ये ठेवून जायचं आहे, असं सांगण्यात आलं आहे. काँग्रेसमधील अत्यंत गोपनीय गोष्टी अनेकदा बाहेर आल्याचे प्रकार याआधी समोर आले आहेत. राजकीय विश्लेषक सांगतात की, अगदी दोन नेत्यांमधील झालेल्या गुप्त बैठकीतील माहिती देखील अनेकदा सूत्रांच्या हवाल्याने समोर येते. या पार्श्वभूमीवर ही काळजी घेतली जात आहे. 






राजकीय, सामाजिक न्याय आणि विकास, अर्थव्यवस्था, संघटन, शेतकरी आणि कृषी, तरुण आणि रोजगार या सहा विषयावर यामध्ये चर्चा करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील काँग्रेस नेत्यांची कमिटीही तयार करण्यात आलेली आहे. या कमिट्यांच्या बैठका शिबिरात होणार आहेत. या बैठकांमधून गोपनीय माहिती बाहेर जाऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.


शिबिराच्या नावामधून 'चिंतन' शब्द हटवला
उदयपूरच्या नवसंकल्प शिबिराच्या नावामधून 'चिंतन' हा शब्द हटवण्यात आला आहे.  चिंतन म्हटलं की मागील घडामोडींची उजळणी तर अपेक्षित असतेच शिवाय 23 नेत्यांच्या पत्रावर काय ठरवायचं यावर चिंतन करावं लागतं. त्यापेक्षा नवसंकल्प म्हटलं की मागे वळून पाहण्याचे बंधनच उरत नाही, तेव्हा प्रश्नच मिटला. ही काँग्रेस आहे, असं  राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख यांनी म्हटलं आहे.


विशाल सामूहिक प्रयत्नांनीच पक्ष पुन्हा उभारी घेऊ शकतो- सोनिया गांधी
बैठकीत बोलताना काँग्रेस कार्याध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, पक्षासमोरचं संकट असाधारण आहे. आपण बदल करणं आवश्यकच आहे.पण विशाल सामूहिक प्रयत्नांनीच पक्ष पुन्हा उभारी घेऊ शकतो. पक्षासमोरचं संकट असाधारण आहे याची मला जाण आहे.  असाधारण संकटाचा सामना हा असाधारण पद्धतीनेच करावा लागतो, असं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिबिरात म्हटलं आहे.  


नवसंकल्प शिबिरातल्या काँग्रेसच्या काही घोषणा:


1.एक व्यक्ती एका पदावर जास्तीत जास्त पाच वर्षे राहू शकणार


2.एक परिवार एक तिकीट, परिवारातल्या सदस्याला तिकीट हवं असेल तर किमान पाच वर्ष संघटनेत काम आवश्यक


3.संघटनेत सर्व कमिट्यांवर 50% युवा असलेच पाहिजेत( 35 ते 50 वयोगटातील अधिक)