राहुल गांधी यांनी केरळ पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले असून, त्यानुसार महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे सर्व आमदार आपले एका महिन्याचे वेतन पक्षाकडे जमा करणार आहेत. केरळवर आलेली नैसर्गिक आपत्ती भीषण असून, आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
दरम्यान, केरळसाठी देशभरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. आम आदमी पक्षानेही केरळसाठी सर्व आमदार, मंत्री आणि खासदारांचं एक महिन्याचं वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केरळला 10 लाख रुपयांचं अर्थसहाय्य दिलं आहे.
राज्य सरकारचाही मदतीचा हात
केरळमध्ये ओढवलेल्या अतिवृष्टीच्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्रातर्फे 20 कोटी रुपयांची तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. शिवाय विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांशी कालपासूनच राज्य सरकार संपर्कात असून त्यांच्याशी समन्वय साधून अन्नपुरवठा आणि इतर मदतीसाठी राज्याकडून पुढाकार घेण्यात आला आहे.
केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झाली आहे. पूरग्रस्तांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. महाराष्ट्राकडूनही तातडीची मदत म्हणून 20 कोटींचं अर्थसहाय्य मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं.
इतर राज्यही सरसावले
महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशातील इतर राज्यांमधून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये मुख्यमंत्री मदत निधीसह अन्न आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठाही करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 10 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही केरळसाठी 10 कोटी रुपयांची मदत केली आहे. हैदराबादमधून अन्नाची पाकीटं सैन्याच्या विमानाद्वारे नेण्यात आली आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 10 कोटी, शिवाय आपचे सर्व आमदार आणि खासदार यांचं एक महिन्याचं वेतन आणि तेलंगणाकडून 25 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.
पुरातील मृतांचा आकडा 324 वर
दरम्यान केरळमधील भीषण पुरात 324 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 2 लाखांहून अधिक जण बेघर झाले आहेत. एकूण 82 हजार लोकांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आलं आहे. केरळमधील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. राज्यातील अनेक भाग पाण्याखाली गेला आहे. रस्ते बंद झाले असून रेल्वे आणि हवाई सेवेलाही फटका बसला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. कोची विमानतळही अद्याप बंद आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडून दिवसरात्र बचावकार्य सुरु आहे.