नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेल्या परीक्षांचं वेळापत्रक यूपीएससीने जाहीर केल्यानंतर एमपीएससीही याबाबत तत्परता का दाखवत नाही, असा सवाल विचारला जात आहे. एमपीएससी म्हणजे कुठला चौकशी आयोग नाही, ज्याने इतका वेळकाढूपणा करत राहावा, असं वक्तव्य काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी केलं आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडीत असलेल्या आयोगाचे तुम्ही सदस्य आहात, अशीही आठवण सातव यांनी आयोगाला करुन दिली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे यूपीएससीच्या परीक्षांचंही वेळापत्रक विस्कळीत झालं होतं. पण यूपीएससीने शुक्रवारी (5 जून) पुढच्या वर्षभराचं वेळापत्रक जाहीर करुन विद्यार्थ्यांच्या मनातला संभ्रम दूर केला आहे.
UPSC/MPSC | यूपीएससीच्या परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर; एमपीएससीही धडा घेणार?
महाराष्ट्रात एमपीएससीच्या अनेक स्पर्धा परीक्षांचे निकाल अद्याप प्रलंबित आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्यसेवा मुख्य परीक्षा (अंतिम निकाल), उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा (अंतिम निकाल) लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा (अंतिम निकाल), कर सहाय्यक मुख्य परीक्षा (अंतिम निकाल), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा व महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा इत्यादींचा समावेश आहे. या सर्व परीक्षांचा निकाल जाहीर झाला नसल्याने विद्यार्थ्यांमधे चिंतेचं वातावरण आहे, मानसिक तणावही वाढत चालला आहे. शिवाय पुढच्या परीक्षांचं वेळापत्रकही अनिश्चित काळासाठी पुढे ढकललं गेलं आहे, त्यामुळे अशावेळी परीक्षांची तयारी करावी की नाही असा संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात आहे. त्यामुळे एमपीएससीनेही याबाबत तातडीने कारवाई करुन विद्यार्थ्यांच्या मनातला गोंधळ दूर करावा अशी मागणी होत आहे.
पार पडलेल्या परीक्षांचे निकाल तातडीने लावून, किमान पुढच्या परीक्षांचं चित्र काय असणार आहे याची स्पष्टता द्यावी, अशी विद्यार्थी आणि पालकांची मागणी आहे. एबीपी माझाच्या एमपीएससी परिषदेतही स्पर्धा परीक्षेशी निगडीत अनेक घटकांनी आयोगाच्या या दिरंगाईच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती.
MPSC परीक्षेची तारीख कधी जाहीर होणार? माझा MPSC परिषद | Education Council for MPSC Students