नवी दिल्ली : क्रिकेटच्या मैदानात धडाकेबाज सलामी देणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची राज्यसभेतली सलामी मात्र गोंधळात हरवून गेली. पाच वर्षानंतर का होईना, पण सभागृहात पहिल्यांदा बोलण्यासाठी सचिन उभा होता. पण काँग्रेस खासदारांच्या गोंधळामुळे सचिनला एकही शब्द बोलता आला नाही.
राईट टू प्ले आणि देशातलं क्रीडा क्षेत्राचं भविष्य या विषयावर राज्यसभेत छोटेखानी चर्चेची नोटीस देण्यात आली होती. या चर्चेत सचिन भाषण करणार होता. दुपारी दोन वाजता ही चर्चा सुरु होणार होती. पण सभागृह सुरु झाल्यावर 2 जी स्पेक्ट्रमच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या माफीची मागणी करत सभागृहात गदारोळ केला.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याबद्दल गुजरातच्या प्रचारात मोदींनी जे विधान केलं होतं, त्यावरुन गेल्या आठवडाभरुन सभागृहाचं कामकाज ठप्प होतंय. त्यामुळे आजही काँग्रेसने माघार घेतली नाही. सभापतींच्या खुर्चीवरुन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे सचिन तेंडुलकर यांना बोलू द्यावं, अशी वारंवार विनंती करत होते. सभागृहाची जी परंपरा आहे, त्यानुसार कुठल्याही खासदाराचं सभागृहातलं पदार्पणाचं म्हणजे पहिलं भाषण हे शांततेत ऐकून त्याचं स्वागत केलं जातं. किमान ती परंपरा पाळा असं नायडू सांगत होते. मात्र त्यानंतरही काँग्रेस खासदारांच्या घोषणा सुरुच होत्या.
सचिन केवळ बाकावर उभं राहून शांतपणे हे सगळं पाहत होता. त्यावर सन्माननीय सदस्य हे भारतरत्न आहेत, ते एक महत्वाचा विषय मांडतायत म्हणून तरी शांत रहा असं नायडूंनी म्हटलं. त्यावर काँग्रेसच्या रेणुका चौधरी यांनी भारतरत्न आहेत म्हणून त्यांना इथे विशेष हक्क प्राप्त होत नाहीत असं म्हटलं.
गोंधळ थांबत नाही म्हटल्यावर अखेर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आणि सचिनची ही पहिल्या भाषणाची संधी हुकली. 27 एप्रिल 2012 मध्ये सचिनची यूपीएच्याच काळात राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून नियुक्ती झाली होती. त्याची टर्म 26 एप्रिल 2018 रोजी संपणार आहे. खासदार म्हणून त्याची सभागृहातली कामगिरी आणि उपस्थिती यावर अनेकदा टीका झाली आहे. मात्र एका नॅशनल आयकॉनला सभागृहात बोलू दिलं गेलं नाही यावर अनेकांनी खंत व्यक्त केली.
समाजवादी पक्षाच्या खासदार आणि सिनेअभिनेत्री जया बच्चन सचिनला बोलता यावं म्हणून सभागृहात दोन्ही बाजूंना आवाहन करत होत्या. ज्या व्यक्तीने देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावलंय, त्याला बोलू दिलं नाही याची खंत वाटते अशी प्रतिक्रिया त्यांनी नंतर दिली. दरम्यान या सगळ्या गदारोळातही उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं कोटी करण्याचं कौशल्य मात्र पुन्हा दिसलं. आपण इथे खेळाबद्दल चर्चा करतोय, पण कुणी खिलाडूवृत्ती दाखवत नाही, असं म्हणत त्यांनी विरोधकांना चिमटा काढला.