नवी दिल्ली: राज्यातल्या नेत्यांनी आपापसातले मतभेद विसरावं आणि कामाला लागावं, येत्या लोकसभेसाठी राज्यातून किमान 20 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवावं असा आदेश काँग्रेसच्या हायकमांडने राज्यातील नेत्यांना दिला. राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची आज नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. त्यामध्ये येत्या सप्टेंबरमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वात यात्रा काढावी आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये महाराष्ट्रात बस यात्रा सुरू करावी असाही ठराव करण्यात आला. 


काँग्रेसचे आतापासूनच लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांना दिल्लीत बोलावून घेतलं होतं. राज्यातील अनपेक्षितपणे घडणाऱ्या राजकीय घडामोडी, शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका आणि काँग्रेसची सध्याची स्थिती यावर चर्चा करण्यात आली. 


आपापसातले वाद मिटवा... कामाला लागा


नेत्यांनी आपापसातले वाद मिटवून कामाला लागावं असा सल्ला काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेत्यांना दिला आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या घडामोडींचा आपल्यावर परिणाम होऊ देऊ नका असाही सल्ला देण्यात आला आहे. लोकसभेसाठी किमान 20 जागांचं टार्गेट काँग्रेस कमांडकडून महाराष्ट्र प्रदेश समितीला देण्यात आलं आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुनिल केदार, सतेज पाटील, अशोक चव्हाण, वर्षा गायकडवाड, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. 


नाना पटोले यांच्याविरोधात नाराजी


काँग्रेस मुख्यालयात झालेल्या आजच्या बैठकीत सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांच्याकडून प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे. बैठकीनंतर हाय कमांडशी वैयक्तिक संवाद साधण्याची काही नेत्यांची इच्छा होती पण तो संवाद होऊ शकला नाही. 


काँग्रेसने महाराष्ट्रापासून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रत्येकाने गट तट विसरून काँग्रेस पक्षाला मजबूत केले पाहिजे. भारत जोडो यात्रेचा अनुभव देशात सर्वात चांगला महाराष्ट्रामध्ये आल्याचं राहुल गांधी यांनी सांगितले. सर्व ज्येष्ठ नेत्यांना ठराविक लोकसभा मतदारसंघांचे जबाबदारी वाटून दिली जाणार असल्याची माहिती आहे. 


मोदींच्या पुरस्कारावरुन दोन गट


यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. त्यावरुन आतचा काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचं दिसतंय. काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पुरस्काराचे समर्थन केलं आहे.  खाजगी संस्थेचा पुरस्कार देणाऱ्याने दिला घेणाऱ्याने घेतला अशी त्यांची भूमिका आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र त्याला विरोध केला आहे. लोकमान्य टिळकांना सुद्धा मोदींना पुरस्कार देणे आवडलं नसतं असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. 


ही बातमी वाचा :