अहमदाबाद : काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींवर केलेल्या वक्तव्यावरुन गुजरातचं राजकारण तापलेलं आहे. त्यातच अय्यर यांच्या नावाने भाजपने काँग्रेसवर मोठा आरोप केला आहे, ज्यात भारतातील सत्ता बदलण्यासाठी पाकिस्तानची मदत घेण्यात येत असल्याचं म्हटलं आहे.
गुजरातच्या बनासकांठा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर मोठा आरोप केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार अहमद पटेल यांना गुजरातचा मुख्यमंत्री करण्यासाठी मणिशंकर अय्यर यांच्या घरी पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यासोबत बैठक झाली, असा आरोप मोदींनी केला.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ही बैठक कशासाठी होती, याचा खुलासा या बैठकीला उपस्थित असलेल्या व्यक्तींनीच करावा, अशी मागणी जेटलींनी केली आहे.
''पाकिस्तानच्या उच्चायुक्तांसोबत काँग्रेस नेत्यांची जी बैठक झाली त्यात गुजरातची रणनिती ठरवण्यात आली का? सत्ताबदलाची रणनिती ठरवण्यासाठी बैठक होती का?'' असा सवाल भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली.
दरम्यान मोदींनी केलेला आरोप निराधार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. शिवाय काँग्रेसने मोदींच्या अचानक ठरलेल्या पाकिस्तान दौऱ्यावरही आक्षेप घेतला आहे.