नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. काँग्रेसचे आक्रमक प्रवक्ते म्हणून राजीव त्यागी यांची ओळख होती. टिव्हीवरील चर्चासत्रांमध्ये ते नेहमीच काँग्रेसची भूमिका भक्कमपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध होते.
राजीव त्यागी यांच्या निधनानंतर काँग्रेसने ट्वीट करुन दुःख व्यक्त केले. 'राजीव त्यागी यांच्या आकस्मिक निधनाने मोठं दुःख झालं, ते एक कट्टर काँग्रेसी आणि एक सच्चा देशभक्त होते.'',
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही ट्वीट करुन सहवेदना व्यक्त केल्या. काँग्रेस प्रवक्ते जयवीर शेरगिल म्हणाले, की त्यांनी आपल्या कुटुबातील एक सदस्य गमावला आहे. हे त्यांचं जाण्याचं वय नव्हतं. बिहार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रेमचंद्र मिश्रा म्हणाले, की “माझा मित्र सहकारी कर्मठ प्रवक्ता राजीव त्यागी याच्या निधनाची बातमी ऐकून स्तब्ध झालोय. आकस्मिक मृत्यूच्या बातमीने दुःख झालं..ॐ शांति.’’
भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, की, "काँग्रेस प्रवक्ता माझे मित्र राजीव त्यागी सोबत राहिले नाही, यावर विश्वास बसत नाही. आज 5 वाजता आम्ही सोबत डिबेट केली. जीवन खूप अनिश्चित आहे...अजूनही शब्द मिळत नाहीय. हे गोविंद राजीव यांना आपल्या चरणी जागा दे.
राजीव त्यागी यांचा जन्म 20 जून 1970 साली झाला आहे. राजीव त्यागी यांचे ट्वीटर हँडल पाहिले तर आज सायंकाळपर्यंत ते एकदम व्यवस्थित होते. त्यांनी सायंकाळी 3 वाजून 41 मिनटाला ट्वीट करुन माहिती दिली होती, की सायंकाळी 5 वाजता एका चॅनेलच्या डिबेटमध्ये सहभागी होणार आहे. या डिबेटमध्ये त्यागी सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. तत्काळ त्यांना गाजियाबाद येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. जेथे त्यांना मृत घोषित केले.
TOP 100 | देशभरातील महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर