मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं मिशन मुंबई सुरु होत आहे. डिंसेबर महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे येत्या 28 डिसेंबरला कॉंग्रेस स्थापना दिवशी पहिल्यांदाच राहुल गांधी शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत.


शिवाजी पार्कवर होणारी ही कॉंग्रेसची पहिली सभा नसली तरी राहुल गांधींची मात्र पहिलीच सभा आहे. यापूर्वी 2003 आणि 2006 मध्ये कॉंग्रेसची सभा सोनिया गांधींच्या नेतृत्वात झाली होती. त्यानंतर 2018  मध्ये राहुल गांधींकरता या मैदानावर सभा घेण्याची परवानगी मागितली गेली.  मात्र, ती नाकारली गेली. मोजक्या 16  दिवसांसाठीच शिवाजी पार्कवर कार्यक्रम घेता येतो. या व्यतिरीक्त वर्षातले जास्तीत जास्त 40 दिवस शिवाजी पार्कवर कार्यक्रम घेतले जातात. मात्र, त्याची परवानगी नगरविकास विभागाकडून घ्यावी लागते. कॉंग्रेसच्या येत्या सभेची परवानगीही नगरविकास विभागाकडून घ्यावी लागेल. 


राज्यात कॉंग्रेस आणि सेनेची आघाडी असली तरी महापालिकेत बिघाडी आहे. मात्र, संजय राऊत आणि राहुल गांधींच्या भेटीनंतरची कॉंग्रेस-सेनेची वाढती जवळीक ही भाजपसोबतच राष्ट्रवादीचीही डोकेदुखी ठरेल. शिवतिर्थ या नावानं ओळखल्या जाणा-या या मैदानावर हिंदुत्वाच्या गर्जनाही घुमल्या आणि कॉमन मिनीमम प्रोग्रामवर आधारलेला शपथविधीही पार पडला. आता हेच मैदान कॉंग्रेसचं पुनरुज्जीवन पाहणार आहे.


राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यशैलीविषयी जाणून घेण्याची इच्छा असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊतांनी सांगितलं होतं.  संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात नवी दिल्लीत जवळपास सव्वा तास खलबतं झाली. राहुल गांधी लवकरच महाराष्ट्रात येणार असल्याचंही राऊत म्हणाले होते. 


संबंधित बातम्या :


राहुल गांधी यांची 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी', संसदेत सरकारला घेरण्याची तयारी सुरु


Rahul Gandhi-Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत राहुल गांधींच्या भेटीला, दोन्ही नेत्यांमध्ये सव्वा तास चर्चा


महागाई, कृषी कायदे आणि पेगॅससवर संसदेत चर्चा करा; राहुल गांधींची मागणी