अंबिकापूर (छत्तीसगड) : शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' निषेध मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी मंगळवारी अंबाला येथील शंभू सीमेवर लावलेले बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर हरियाणा पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. दिल्ली गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. स्वामिनाथन आयोगानुसार प्रत्येक शेतकऱ्याला पिकांवर एमएसपीची कायदेशीर हमी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. हे पाऊल 15 कोटी शेतकरी कुटुंबांची समृद्धी सुनिश्चित करून त्यांचे जीवन बदलेल. न्यायाच्या मार्गावर काँग्रेसची ही पहिली हमी आहे.
शेतकऱ्यांना एमएसपीची हमी देऊ
छत्तीसगडमध्ये पोहोचलेले काँग्रेस नेते राहुल गांधी अंबिकापूरमध्ये म्हणाले की, इंडिया आघाडी सरकार आल्यास आम्ही शेतकऱ्यांना एमएसपीची हमी देऊ, ही फक्त आमची सुरुवात आहे. ते म्हणाले की, “आज शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. त्यांना रोखले जात आहे, त्यांच्यावर अश्रुधुराचे नळकांडे डागले जात आहेत. ते काय म्हणत आहेत? ते फक्त त्यांच्या मेहनतीचे फळ मागत आहेत.
स्वामिनाथन यांचा मुद्दा अमलात आणण्यास भाजप तयार नाही
राहुल गांधी पुढे म्हणाले की, “भाजप सरकारने एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली, परंतु एमएस स्वामीनाथन यांनी सांगितलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यास ते तयार नाहीत. त्यांनी आपल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, शेतकऱ्यांना MSP चा कायदेशीर अधिकार मिळायला हवा. भाजप सरकार हे करत नाही. इंडिया आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर भारतातील शेतकऱ्यांना एमएसपी हमी देण्यासाठी कायदा करू. स्वामिनाथन अहवालात जे सांगितले आहे ते आम्ही पूर्ण करू.”
राहुल म्हणाले की, या देशातील गरीब, शेतकरी, मजूर आणि छोटे व्यापारी यांच्यावर रोज अन्याय होत आहे. ज्या समाजात अन्याय असेल तिथे हिंसा आणि द्वेष असेल. दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “आता 62 कोटी शेतकऱ्यांचा आवाज उठवण्याची वेळ आली आहे. आज छत्तीसगडमधील अंबिकापूरमध्ये काँग्रेस पक्ष 'किसान न्याय'चा आवाज बुलंद करणार आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. घाबरणार नाही आणि झुकणार नाही.”
इतर महत्वाच्या बातम्या