Rahul Gandhi : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा देशातील विविध भागांमधून सुरू आहे. काँग्रेसची ही भारत जोडो यात्रा सध्या जम्मू-काश्मीरमध्ये आहे. काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून नुकताच राजस्थानमधील भारत जोडो यात्रेदरम्यानचा राहुल गांधी यांच्या प्रवास आणि फूड चॅनल कर्लिटेल्ससोबतच्या मजेदार संभाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधींनी त्यांच्याविषयीच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी या व्हिडीओमध्ये ते पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात आधी काय करणार याबाबत देखील सांगितलं आहे.
Rahul Gandhi : पंतप्रधान झाल्यानंतर 'या' तीन गोष्टींना प्राधान्य देणार
राहुल गांधी यांनी यावेळी आपण पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात आधी काय करणार याबाबत सांगितले आहे. "मी पंतप्रधान झालो तर प्रथम शिक्षण पद्धतीत बदल करणार. याशिवाय मध्यम-उद्योगांना मदत करणार. याबरोबरच शेतकरी आणि बेरोजगार तरुणांसह कठिण परिस्थितीतून जात असलेल्या लोकांच्या पाठीशी उभे राहणार, असे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.
Rahul Gandhi :राहुल गांधींचा पहिला पगार किती होता?
राहुल गांधी यांनी यावेळी त्यांच्या नोकरी आणि पगाराबाबतही सांगितले आहे. आपल्या पहिल्या नोकरीबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले, माझा पहिला पगार जवळपास तीन लाख रूपये होता. मी लंडनमधील मॉनिटर कंपनीत सल्लागार म्हणून काम करत होतो. त्यावेळी माझा पहिला पगार खूप होता. तो पगार घरभाडे आणि इतर गरजेच्या गोष्टींमध्येच जात असे. त्यावेळी मी केवळ 25 वर्षांचा होतो, असं देखील राहुल गांधी म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या प्रवास आणि फूड चॅनल कर्लीटेल्ससोबतच्या मजेदार संभाषणाच्या व्हिडिओतून त्यांनी अनेक गोष्टींबाबत सांगितले आहे. सध्या त्यांनी वाढवलेली दाढी काढण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर खूप दबाव येत असल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले. याबरोबरच लग्नाच्या प्लॅनवर राहुल गांधी म्हणाले, मी लग्नाच्या विरोधात नाही. माझी कोणतीही चेकलिस्ट नाही तर फक्त एक प्रेमळ आणि बुद्धिमान जीवनसाथी असावा, असं राहुल गांधी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या