Rahul Gandhi : खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्दे उपस्थित करत काही प्रश्न विचारले आहेत. तसेच देशात रोज लोकशाहीवर आक्रमण होत असल्याचे ते म्हणाले. अदानींच्या कंपनीतील गुंतवलेले 20 हजार कोटी रुपये नेमके कोणाचे? असा सवालही राहुल गांधी यांनी केला. पाहुयात राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्त्वाचे मुद्दे


राहुल गांधी यांच्या भाषणातील 10 मुद्दे


1) देशातील लोकशाहीवर रोज आक्रमण होत असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. 


2) अदानी यांच्या शेल कंपनीत 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे संबंध कसे आहेत? असा सवालही त्यांनी केला.


3) संसदेत माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले. पण मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. मला कोणाही घाबरवू शकत नाही.


4) अदानी हे भ्रष्ट आहेत, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना का वाचवत आहेत? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. अदानी भ्रष्ट आहेत हे जनतेला माहित असल्याचेही गांधी म्हणाले.


5) खासदारकी रद्द केली तरी मी घाबरणार नाही. माझं नाव गांधी आहे. मी कोणाची माफी मागणार नाही. गांधी कधी माफी मागत नाहीत. माफी मागायला मी सावरकर नाही असेही राहुल गांधी म्हणाले. 


6) अदानींवर झालेले आक्रमण देशावर झालेले आक्रमण असल्याचे भाजपच्या लोकांना वाटत आहे. त्यांना देश अदानी आणि अदानी देश असल्याचे वाटत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 


7) संसदेत अदानी आणि मोदींचा काय संबंध विचारल्यानंतर भाजपने माझ्याविरोधात ओरड सुरु केल्याचे राहुल म्हणाले. मोदी आणि अदानी यांचं नातं नवीन नाही. ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांचे अदानींशी संबंध असल्याचे गांधी म्हणाले. 


8) प्रश्न विचारणे मी सोडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अदानींसोबत कोणते संबंध आहेत आणि ते 20 हजार कोटी कोणाचे आहेत हा प्रश्न मी विचारत राहणार असल्याचे गांधी म्हणाले. 


9) मला धमकावून,जेलमध्ये टाकून, माझी खासदारकी रद्द करुन मला ते थांबवू शकत नाहीत. मी देशातील लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.    


10) मी सत्य बोलत आहे. ते माझ्या रक्तात असल्याचे राहुल गांधी म्हणाले. हीच माझ्या जीवनाची तपस्या असल्याचे गांधी म्हणाले.  


महत्त्वाच्या बातम्या:


Rahul Gandhi :  पंतप्रधान मोदींना माझ्या पुढच्या भाषणाची भीती, म्हणून माझी खासदारकी रद्द केली : राहुल गांधी