Tag News : केंद्रीय मंत्रिमंडळाने 2023-24 च्या हंगामासाठी कच्च्या तागाच्या (Raw jute) किमान हमीभावाला (MSP) मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 2023-24 या हंगामासाठी कच्च्या तागाचा ( टीडी-3 यापूर्वीच्या टीडी-5 स्तराइतका) हमीभाव प्रतिक्विंटल 5050 रुपये निश्चित करण्यात आला आहे. कृषी खर्च आणि दर आयोगाच्या (CACP) शिफारशीवरुन ही मंजुरी देण्यात आली आहे.
उत्पादन खर्चाच्या सरासरीच्या 63.20 टक्के परतावा सुनिश्चित होणार
कच्च्या तागाच्या विक्रीसाठी किमान हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. या हंगामात प्रतिक्विंटलसाठी कच्च्या तागाला 5050 रुपयांचा हमीभाव मिळणार आहे. यामुळं उत्पादन खर्चाच्या सरासरीच्या 63.20 टक्के परतावा सुनिश्चित होईल, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. 2023-24 च्या हंगामासाठी कच्च्या तागाचा जाहीर करण्यात आलेला हमीभाव हा 2018-19च्या अर्थसंकल्पात सरकारनं जाहीर केल्यानुसार अखिल भारतीय भारित सरासरीच्या किमान दीडपट हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळं नफ्याचे प्रमाण किमान 50 टक्के सुनिश्चित करण्यात आल्याची माहितीही सरकारकडून देण्यात आली आहे.
ताग उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन
ताग उत्पादक शेतकऱ्यांना चांगला परतावा सुनिश्चित करण्यासाठी हमीभावात वाढ करण्यात आली आहे. तसेच दर्जेदार तागाचे उत्पादन करणाऱ्यांना प्रोत्साहन निधी मिळवून देण्यासाठी हे एक महत्त्वाचे आणि प्रगतीशील पाऊल असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. अशा प्रकारच्या परिचालनांमध्ये भारतीय ताग महामंडळ केंद्र सरकारची नोडल संस्था म्हणून काम करेल. तसेच दरांच्या पाठबळाच्या परिचालनाचे काम हाती घेईल आणि यामध्ये काही नुकसान झाल्यास केंद्र सरकार त्याची संपूर्ण भरपाई देईल अशी माहितीही देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: