EXCLUSIVE :  "पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करत नाहीत. निर्णय घेतल्यानंतर ते विचार करतात. नोटाबंदी, जीएसटी, कोरोनावेळी घेतलेल्या अनेक निर्णयांवर पंतप्रधान मोदी यांनी विचार केला नाही.  आर्थिक निर्णयात त्यांनी चुका केल्या आहेत, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी केला आहे. 


दिग्विजय सिंह यांनी एबीपी न्यूजसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपकडून अनेक विषयांवर झालेल्या चुकांचा पाढाच वाचला. "आज आपली अर्थव्यवस्था संकटात आहे.  डॉलरचे मूल्य 80 रुपयांवर पोहोचले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांनी हा चर्चेचा मुद्दा बनवला होता. नरेंद्र मोदींनी काळा पैसा, स्विस बँकांमधील पैसा हा मुद्दा उपस्थित केला होता, मात्र आता त्यांच्या कार्यकाळात स्विस बँकांमध्ये जमा होणारा पैसा वाढला आहे. त्यांनी एसआयटी स्थापन केली होती, पण आम्हाला आजपर्यंत अहवाल मिळालेला नाही. कुठे आहे तो काळा पैसा? पनामा पेपर्स प्रकरणात काय घडले?  मोदींना प्रश्न करणे अशक्य आहे कारण ते पत्रकार परिषदच घेत नाहीत, असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला.   
 
महागाईवरून सरकारवर निशाणा 


देशातील वाढत्या महागाईवरून दिग्विजय सिंह यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. "लोकांचे पगार वाढले नसून खर्च वाढले आहेत. शालेय फी, खाद्यपदार्थ, पेट्रोल-डिझेलचे दर, सर्वत्र भाव वाढले आहेत. देशात बेरोजगारी वाढली आहे, पण सरकार काय करतंय हेच कळत नाही. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीच्या वेळी बनावट नोटा थांबवल्या जातील असे सांगितले होते. आज गुजरातमध्ये सर्वाधिक बनावट नोटा पकडल्या जात आहेत. काळा पैसाही परत आला नाही आणि देशातील दहशतवादही संपलेला नाही, अशी टीका दिग्विजय सिंह यांनी केली.  


नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या ईडीच्या चौकशीबाबत दिग्विजय सिंह म्हणाले, पैशांचा कोणताही व्यवहार झाला नाही. जे काही आरोप केले जात आहेत ते चुकीचे आहेत. चोरी, गंडा घालणे असे आरोप बिनबुडाचे आहेत. आमचा कोणताही आक्षेप नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. नेहरू-गांधी परिवाराला बदनाम करण्याचा हा संपूर्ण राजकीय षडयंत्र आहे.