नवी दिल्ली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नगरपालिका निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना-भाजपने सत्तेचा प्रचंड गैरवापर केल्याचा आरोप चव्हाणांनी केला आहे.


राज्य पातळीवरील किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मिळालेल्या विजयाची पत्रकार परिषद एखाद्या केंद्रीय स्तरावरील नेत्याने घेणं हास्यास्पद असल्याची टीकाही त्यांनी केली. 23 नगरपालिकांवर काँग्रेसचा झेंडा फडकला, हा निकाल वाईट नाही, मात्र आणखी चांगला होऊ शकला असता. मिळालेलं यश अपेक्षेपेक्षा कमी असल्याचंही चव्हाणांनी मान्य केलं.

मुख्यमंत्री विदर्भातील असल्यामुळे विदर्भात भाजपाचे 26 नगराध्यक्ष निवडून आले, मी मुख्यमंत्री असताना काँग्रेसला मराठवाड्यात फायदा झाला होता. मात्र सत्तेचा प्रचंड गैरवापर शिवसेना-भाजपने केला आहे. मतं दिली नाहीत तर निधी मिळू देणार नाही, अशी जाहीर वक्तव्य भाजप मंत्र्यांनी केल्याचा दावाही अशोक चव्हाणांनी केला आहे.

काँग्रेसचे 643 नगरसेवक निवडून आले, ही आकडेवारी पाहता काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर काँग्रेसने 72 नगरपंचायती जिंकल्या असून भाजपकडे अवघ्या 46 नगरपंचायती आहेत. म्हणजेच काँग्रेस अव्वल स्थानी आहे. काही जिल्ह्यात शून्य टक्के निकाल लागला. तिथे बारकाईने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. जिथे नेतृत्वाने लक्ष दिलं तिथे यश मिळालं, जिथे दुर्लक्ष केलं तिथे अपयश मिळाल्याची कबुलीही त्यांनी दिली.

राणेंचे आरोप गांभीर्याने

नारायण राणेंनी प्रदेश नेतृत्व गंभीर नसल्याच्या केलेल्या आरोपांवरही चव्हाणांनी उत्तर दिलं. सध्याच्या काळात एकाही सदस्याने पैसे देऊन किंवा वशिलेबाजीने पद मिळवल्याचं उदाहरण माहितीत नाही. तसं सिद्ध झाल्यास तातडीने आपण कारवाई करु. राणेंचे आरोप आपण गांभीर्याने घेत असल्याचंही अशोक चव्हाण म्हणाले.

विखे-पाटील आणि थोरातांमध्ये तोडग्याचे प्रयत्न

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातला वाद आता काही लपून राहिलेला नाही. पश्चिम महाराष्ट्रातल्या या दोन नेत्यांमधून विस्तव जात नाही. मात्र त्यांच्यातला हा वाद मिटवण्यासाठी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार असल्याचंही ते म्हणाले.

दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याविषयी आम्हाला सन्मान आहे, त्यांचे राजकीय आणि वैयक्तिक मतभेद टोकाचे झाले आहेत. आम्ही तोडग्याचे प्रयत्न केले, पक्षाला दोघांची गरज आहे, त्यामुळे वाद लवकर शमेल अशी आशा अशोक चव्हाणांनी व्यक्त केली.

पाहा व्हिडिओ :