नवी दिल्ली : काँग्रेसने 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. काँग्रेस कॅम्ब्रिज अॅनालिटिका या प्रसिद्ध कंपनीच्या संपर्कात आहे. याच कंपनीने गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका निभावली होती.


कॅम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीकडून ग्राहकांच्या इंटरनेट डेटाचं विश्लेषण केलं जातं. यावरुन लोकांच्या आवडी-निवडी, जिव्हाळ्याचे विषय लक्षात घेऊन रणनिती तयार केली जाते. या विश्लेषणात ऑनलाईन सर्चिंग, ई-मेल आणि शॉपिंग वेबसाईट्सही चाळल्या जातात. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशात सोशल मीडियाचा महत्त्वाचा वाटा होता. सोशल मीडियाचा ग्रामीण भागाशी संबंध नाही, असं म्हणून त्यावेळी अनेक पक्षांनी सोशल मीडियाला प्राधान्य दिलं नाही. मात्र भाजपच्या विजयात सोशल मीडियाचीच भूमिका महत्त्वाची असल्याचं समोर आलं. त्यामुळे आता काँग्रेसनेही भाजपच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे.

कॅम्ब्रिज अॅनालिटिकाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्झांडर निक्स यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत यूपीएची रणनिती आखण्यासाठी अनेक विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्याचं वृत्त आहे. मतदारांना इंटरनेटच्या माध्यमातून जोडून धोरण कसं आखता येऊ शकतं, याबाबत कंपनीने काँग्रेससमोर एक सादरीकरण केलं असल्याची माहिती आहे.

जगातील अनेक पक्ष कॅम्ब्रिज अॅनालिटिकाच्या संपर्कात आहेत. केवळ अमेरिकेतच नाही तर ब्रेक्झिटच्या वेळीही कॅम्ब्रिज अॅनालिटिकाने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची रणनिती आखणारी ही कंपनी आता काँग्रेसच्या मदतीला धावून येण्याची शक्यता आहे.

अमेरिकेतील भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी हिंदीमध्ये जाहिराती करण्यात आल्या. व्हर्जिनियातील मंदिरात ट्रम्प यांच्या मुलीने दिवाळी साजरी केली. ही सर्व रणनिती कॅम्ब्रिज अॅनालिटिकाने आखल्याचं बोललं जातं.