नवी दिल्लीः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार धरणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं. मात्र आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून कसलीही माफी मागणार नाही, असं काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
एकतर या प्रकरणी माफी मागा नाहीतर बदनामीच्या खटल्याला सामोरं जा, या शब्दांत न्यायालयाने राहुल गांधींना सुनावलं आहे. त्यानंतर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे येत्या काळात काँग्रस विरुद्ध संघ हा वाद कोर्टात रंगण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. बदनामीकारक वक्तव्य करून एखाद्या संघटनेची तुम्ही सरसकट बदनामी करू शकत नाही. असंही कोर्टानं सांगितलं आहे.
राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याला ऐतिहासिक आधार आहे. सरकारी नोंदीमध्ये त्याबद्दल उल्लेख आहे, असा युक्तिवाद राहुल गांधी यांच्या वकिलाकडून करण्यात आला. दरम्यान काँग्रेसने स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळे नवा वाद रंगण्याची शक्यता आहे.