नवी दिल्ली: सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय गेल्या काही महिन्यांपासून करत आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात कोणतीही शक्यता फेटाळली नसून आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तपास केला जाणार आहे, असं सीबीआयने खासदार सुब्रमण्यम स्वामी यांना एका पत्राद्वारे सांगितलं आहे.


सुब्रमण्यम स्वामींच पत्र
खासदार सुब्रमण्यम स्वामींनी जुलैमध्ये (PMO) पंतप्रधान कार्यालयाला एक पत्र लिहून सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तपास कुठपर्यंत आला अशी विचारणा केली होती. पंतप्रधान कार्यालयाने हे पत्र सीबीआयकडे पाठवलं होतं. आता 30 डिसेंबर रोजी सीबीआयने याचं उत्तर दिलं असून त्यामध्ये सांगितलं आहे की अजून या प्रकरणाचा तपास पूर्णपणे संपवला नाही. सीबीआयने या पत्रात सांगितलंय की, ते अनेक बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत असून आता यामध्ये अत्याधुनिक वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.


सीबीआयने खासदार सुब्रमण्यम स्वामींना पाठवलेल्या पत्रात आतापर्यंत या तपासात काय प्रगती झाली याचा उल्लेख केला असून सुरुवातीपासूनचा घटनाक्रम मांडला आहे. सुरुवातीला जेव्हा पाटनामध्ये एफआयआर दाखल झाला तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. त्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये तपास केला, मुंबईच्या बाहेर ज्या-ज्या ठिकाणी या घटनेचा संदर्भ आढळतो त्या-त्या ठिकाणी तपास केला.


ती हत्या नव्हती, एम्सचा अहवाल
सीबीआयने या प्रकरणाचा तपास स्वत: कडे घेऊन जवळपास पाच महिने होत आहेत. दरम्यानच्या काळात ऑक्टोबर महिन्यात एम्सने सीबीआयला एक फॉरेन्सिक अहवाल दिला होता. त्यामध्ये सुशातंचा मृत्यू हा आत्महत्येमुळे झालेला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. या एम्सच्या अहवालावर सीबीआयचं नेमकं काय मत आहे हे अद्याप समोर आलं नाही आणि त्याचा कुठेही उल्लेख या पत्रामध्येही नाही.


देशाच्या सर्वोच्च तपास संस्थेने सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास मुंबई पोलिसांकडून घेऊन आतापर्यंत 145 दिवस झाले आहेत. तरीही या प्रकरणात एकही नवी माहिती समोर आली नाही. तसेच एम्सच्या अहवालावरही काहीच उत्तर सीबीआयकडून देण्यात येत नाही. अद्याप तपास सुरु आहे एवढंच उत्तर सीबीआयकडून देण्यात येत आहे.


संबंधित बातम्या: