Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत गाणे अनिवार्य करण्यात आले आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाचे (Madrasa Education Board) रजिस्ट्रार एस एन पांडे यांनी 9 मे रोजी सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकार्‍यांना याबाबत आदेश जारी केला आहे. पांडे यांनी आदेशात म्हटले आहे की, 24 मार्च रोजी बोर्डाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नवीन शैक्षणिक सत्रापासून सर्व मदरशांमध्ये प्राथनेच्या वेळी राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे.


राष्ट्रगीताचे नियमित निरीक्षण


पांडे म्हणाले की, रमजान महिन्यात मदरशांमध्ये 30 मार्च ते 11 मे या कालावधीत सुट्टी जाहीर करण्यात आली होती. तसेच 12 मे पासून नियमित मदरशे सुरू झाले होते. त्यामुळे आजपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे. राज्यातील सर्व मान्यताप्राप्त अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांमध्ये आगामी शैक्षणिक सत्रापासून मदरशे सुरू होण्यापूर्वी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना इतर प्रार्थनेसह राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आले आहे, असे आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे पालन व्हावे यासाठी जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांना नियमितपणे देखरेख करावी लागणार आहे.


वर्ग सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत गायले जाईल


शिक्षक संघ मदारीस अरबियाचे सरचिटणीस दिवाण साहेब जमान खान यांनी सांगितले की, आत्तापर्यंत मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी सहसा हमद (अल्लाहची स्तुती) आणि सलाम (मुहम्मद साहब यांना अभिवादन) वाचले जात होते. काही ठिकाणी राष्ट्रगीतही गायले जात होते, मात्र ते बंधनकारक नव्हते. आता ते अनिवार्य करण्यात आले आहे.


दरम्यान, युपीचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री धरमपाल सिंह यांनी मागील महिन्यात मदरशांमध्ये राष्ट्रवाद शिकवण्यावर भर दिला होता. तर राज्यमंत्री दानिश आझाद अन्सारी यांनीही म्हटले होते की, मदरशातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण व्हावी, अशी सरकारची इच्छा आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Sedition Law : 2014 ते 2020 दरम्यान देशद्रोह कायद्यांतर्गत 399 गुन्हे, दोषी सिद्ध होण्याचं प्रमाण अवघं 2.25 टक्के
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था रामभरोसे! डॉक्टर, नर्सेसच्या अनेक जागा रिक्त