या मॉक ड्रिलसाठी स्वयंसेवक म्हणून अन्य विद्यार्थी खाली संरक्षक नेट लावून उभे होते. मात्र पीडित विद्यार्थिनीला ढकलल्यानंतर पहिल्या मजल्याच्या कठड्याला तिचं डोकं आपटून तिचा मृत्यू झाला. या घटनेचा विचलित करणारा व्हिडीओ सध्या शेअर होत आहे.
लोकेश्वरी कोईमतूरमधील कलईमगल आर्ट्स आणि सायन्स महाविद्यालयात बीबीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. काल या कालेजमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात होते. त्यावेळी अनेकांनी वरुन उड्या मारुन यशस्वी बचाव केल्याची प्रात्यक्षिकं दाखवली. मात्र लोकेश्वरीला वरुन खाली उडी मारण्याचं धाडस होत नव्हतं. ती प्रचंड घाबरत होती. त्यावेळी प्रशिक्षक अरुमुगन तिला उडी मारण्यासाठी सांगत होते, तिला प्रेरणा देत होते. मात्र तरीही लोकेश्वरी घाबरत असल्याचं पाहून, प्रशिक्षकाने तिला मागून धक्का दिला.
लोकेश्वरी खाली कोसळताना तिचं डोकं पहिल्या मजल्याच्या गॅलरीला धडकलं. त्यामुळे तिला जबर दुखापत झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
हे प्रात्यक्षिक राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आयोजित केलं होतं, असा दावा कॉलेज प्रशासनाने केला आहे.
मात्र तामिळनाडूचे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे आयुक्त राजेंद्र रत्नू यांनी या प्रात्यक्षिकाबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे. तसंच कोणतीही आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरं ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फतच आयोजित केली जातात, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, प्रशिक्षक अरुमुगन यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत, लोकेश्वरीच्या मृत्यूप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.