नवी दिल्ली : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच दिल्लीवारी करत अनेक राजकीय नेत्यांची भेट घेतली. सर्वप्रथम दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचा मोठा भाऊ अर्थात पंतप्रधान मोदींना भेटले. त्यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी सीएए, एनआरसीविषयी आपली भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही भेट घेतली. उद्धव ठाकरे आज गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार आहेत.


आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचीही भेट झाली. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानी तासभर चर्चा झाली. केंद्रानं रखडवलेला महाराष्ट्राचा निधी, संपूर्ण देश ढवळून काढणारे सीएए, एनआरसी आणि एनआरपी हे कायदे आणि याशिवाय इतर महत्त्वाच्या विषयांवर मोदी आणि ठाकरेंमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. यानंतर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सीएएला घाबरण्याचं कारण नाही : मुख्यमंत्री
सीएएला घाबरण्याचं काही एक कारण नसून, एनआरसी हा फक्त आसाममध्येच लागू होणार असल्याची माहिची उद्धव ठाकरेंनी मोदींशी केलेल्या चर्चेनंतर दिलीय. तर एनपीआर हा जनगणनेचा भाग असल्यानं त्याला विरोध नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा तिन्ही कायद्यांना तीव्र विरोध आहे. अशात उद्धव ठाकरेंनी कायद्यासंदर्भात मांडलेल्या भूमिकेनंतर सोनिया गांधी आणि शरद पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

CAA ला घाबरण्याची गरज नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सोनिया गांधी यांच्यासोबत तासभर चर्चा -
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी तासभर चर्चा केली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. सोबतच पत्रकार परिषदेत सीएए आणि एनआरसी वरुन घेतलेल्या भूमिकांवरही दोघांच्या चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली. लालकृष्ण अडवाणी आणि शिवसेनेचे जुने संबंध आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी अडवाणी यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या सर्व भेटीदरम्यान, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्या ठाकरे सोबत होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहां यांचीही भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये काय खलबतं हे मात्र गुलदस्त्यात आहे.

CM Thackeray Meet Advani | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट