रतलाम : काही पेट्रोल (Petrol) पंपावर इंधन भरल्यावर वाहनांचा अव्हरेज कमी येतो, अशा तक्रारी अनेकदा केल्या जातात. तर, काहीवेळा पेट्रोल पंपावरील पेट्रोल किंवा डिझेल या पदार्थांमध्ये पाण्याचाही अंश असल्याचे व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, आता चक्क मुख्यमंत्री (Chief minister) महोदयांच्या ताफ्यातील इनोव्हा कारमध्येच पेट्रोल पंपावर इंधनाऐवजी पाणी भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील 19 इनोव्हा कारमध्ये (Car) गुरुवारी रात्री डिझेल भरण्यासाठी ढोसी गावातील भारत पेट्रोल पंपावर गेल्या होत्या. मात्र, त्यानंतर काही वेळातच या गाड्या बंद पडल्याने ही घटना उघडकीस आली. 

Continues below advertisement

मुख्यमंत्री मोहन यादव यांचा ताफा रतलाम येथे एमपी राईज 2025 कॉन्क्लेव्हसाठी रवाना झाला होता. त्यामुळे, या ताफ्यातील 19 इनोव्हा कारमध्ये डिझेल भरण्यासाठी ढोसी गावातील पेट्रोल पंपावर त्या कार थांबल्या होत्या. मात्र, येथील पंपावर डिझेल भरल्यानंतर काही वेळातच या कार पुढे जाऊन अचानक बंद पडल्याची घटना घडली. मुख्यमंत्र्‍यांच्या ताफ्यातील कार अचानक बंद पडल्याने प्रशासकीय अधिकारी व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, कारमधील डिझेल खाली करण्यात आले असता पेट्रोलच्या टाकीत पाणी आढळून आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्यामुळे, पेट्रोल पंपावरच गाड्यांचे इंधन टँक खोलून तपासणी करण्यात आली. यावेळी, पेट्रोल पंपाला गॅरेजचे स्वरुप प्राप्त झाले होते. रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. 

अधिकाऱ्यांकडून पेट्रोल पंप सील

दरम्यान, इंदौरवरुन दुसऱ्या गाड्या मागवून मुख्यमंत्र्‍यांचा ताफा पुढे नेण्यात आला. या घटनेनंतर प्रशासनाने ढोसी गावातील हा पेट्रोल पंप सील केला असून पुढील तपास आणि चौकशी करण्यात येत आहे. नायब तहसीलदार आशीष उपाध्याय, अन्न व नागरी पुरवठा अधिकारी आनंद गोरे, यांच्यासह इतरही अधिकारी पेट्रोल पंपावर पोहोचले. त्यानंतर, गाडीचे इंधन टँक खोलण्यात आले, त्यावेळी या टँकमध्ये 20 लिटर डिझेलमध्ये 10 लिटर पाणी असल्याचे निष्पण्ण झाले. विशेष म्हणजे सर्वच गाड्यांची हीच अवस्था होती. तर, नुकतेच एका ट्रकने 200 लिटर डिझेल टाकले होते. तो ट्रकही काही वेळानंतर रस्त्यावरच धावता धावता बंद पडला होता. भारत पेट्रोलियमचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून पावसाच्या पाण्यामुळे टाकीत पाणी गेल्याचं तेथील काही कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

हेही वाचा

राज अन् उद्धव ठाकरेंचा मोर्चा मी निघू देणार नाही; सदावर्तेंचा इशारा, हिंदी भाषेवरूनही तोडले तारे