एका थेंबात संपूर्ण सागर मावावा, तसं पंचमदांचं एकच गाणं अख्खं आयुष्य व्यापून जातं...कधी लहरी, कधी बिनधास्त, कधी गुलाबी झुला… आणि कधी मनाच्या खोलशा कोपऱ्यात दाटून बसलेली शांत संध्या.

आरडी बर्मन अर्थात आपले पंचमदा... 

पंचमदा यांच्या संगीताचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गाण्यांची रेंज... 'चिंगारी कोई भडके' किंवा 'ओ मांझी रे अपना किनारा' ही गाणी काळजात खोलवर रुततील, तर दुसरीकडे 'मेहबूबा ओ मेहबूबा' किंवा 'तुम क्या जानो मोहब्बत क्या है' ही गाणी ऐकून तुमचे पाय आपोआपच थिरकतील. आणि हेच 'आजकल पाँव जमीन पर नहीं पडते मेरे' आणि 'हमसे तुमसे प्यार कितना' यांसारखी असंख्य गाणी तुम्हाला रोमँटिसिझमचा अनुभव देतील.

 27 जून 1939 रोजी एसडी बर्मन यांच्या घरात मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव ठेवलं राहुल. टोपण नाव धारा तुबलू. तुबलू च्या पंचम बनण्यापर्यंतचे अनेक किस्से आहेत. त्यापैकी एक म्हणजे, आरडी बर्मन पाच सुरांमध्ये रडायचे. यातला दुसरा किस्सा असा की, जेव्हा जेव्हा एसडी बर्मन रियाझ करताना 'सा' म्हणायचे, तेव्हा तेव्हा आरडी बर्मन सप्तसुरातला पाचवा सुर म्हणजे 'पा' म्हणायचे. आरडी बर्मन यांनी आपल्या नावाबद्दल एक खुलासा केला होता त्याप्रमाणे, त्यांना हे नाव अभिनेते अशोक कुमार यांनी दिलं होतं.

आरडी बर्मन ऐन तारुण्यात होते, अगदी तेव्हाच त्यांचे वडील मुंबईत बसून भारतीय चित्रपटसृष्टीतील संगीताच्या सुवर्णकाळाचा पाया घालत होते. वयाच्या अकरा, बाराव्या वर्षापासून पंचमने वडिलांसोबत स्टुडिओत जायला सुरुवात केली. वडिलांबरोबर चित्रपट म्युजिक रेकॉर्डिंगचे बारकावे जवळून पाहिले आणि शिकूनही घेतले. मुंबईत , बर्मन यांनी उस्ताद अली अकबर खान ( सरोद ) आणि समता प्रसाद ( तबला ) यांच्याकडून प्रशिक्षण घेतले .ते सलील चौधरींना त्यांचे गुरू देखील मानत .लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीच्या म्हणण्यानुसार आरडी बर्मन यांच्यासारखा माउथ ऑर्गन वाजवणारी व्यक्ती देशात आतापर्यंत नव्हती. फार कमी लोकांना माहित असेल की 'है अपना दिल तो आवारा' मध्ये पंचमदा यांनी स्वतः माऊथ ऑर्गन वाजवलाय. राजश्री प्रॉडक्शनच्या सुपरहिट 'दोस्ती' मधील गाण्यातला माऊथ ऑर्गन सुद्धा त्यांनीच वाजवलाय. नंतरच्या काळात पंचमदा यांनी उस्ताद अली अकबर खान, पंडित समता प्रसाद आणि सलील चौधरी यांच्याकडून माऊथ ऑर्गनच प्रशिक्षण घेतलं.

1961 साली आलेल्या मेहमूदच्या 'छोटे नवाब' या चित्रपटातून आरडी बर्मन यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. या चित्रपटातील "मतवाली आँखोंवाले, ओ अलबले दिलवाले" हे गाणं फारच गाजलं. मेहमूद आणि हेलनच्या या सहा मिनिटांच्या गाण्यात, आरडी बर्मन यांनी आपल्या प्रतिभेची झलक दाखवली. या प्रयोगामुळे हिंदी चित्रपटसृष्टीचं संगीत पुढच्या वीस तीस वर्षांसाठी कायमचं बदलून जाणार होत. त्याकाळी चित्रपटाची गाणी साधारणपणे तीन ते चार मिनिटांची असायची. एक राग, एक मुखडा आणि दोन-तीन अंतरे. फालतू समजल्या जाणाऱ्या वाद्यांपासून अंतर राखलं जायचं. या एका गाण्यात आरडी बर्मन यांनी सर्व नियम तोडले. 

आरडी बर्मन यांना लोकांपर्यंत पोहोचायला तशी तर पाच वर्षे लागली. पण 1966 मध्ये आलेल्या 'तिसरी मंझिल'ने संगीत रसिकांना आरडी बर्मन यांची दखल घ्यायला लावली. 'आजा आजा मैं हूं प्यार तेरा' आणि 'ओ हसीना जुल्फों वाली' सारखी भन्नाट गाणी यापूर्वी कधी तयारच झाली नव्हती. नासिर हुसेन यांच्या या चित्रपटात पंचमदांनी जो प्रयोग केला होता, तो प्रयोग प्रत्येक संगीतकाराला करावासा वाटत होता. पण सुरुवात पंचमदांनीच केली. यात त्यांनी इतकी इतकी वाद्य वापरली की संगीत तज्ज्ञही चकित झाले होते. व्हायब्राफोन, व्हायोलिन, चालो, चाइम, ट्रम्पेट, ड्रम्स, सॅक्सोफोन, काँगो, त्रिकोण, कॅस्टनेट्स आणि काय काय वापरलं नाही? चित्रपट संगीतातील हा एक अभिनव प्रयोग होता जो अनेक दशकांपासून व्हायोलिन, सितार, गिटार आणि तबल्यावरच अवलंबून होता. या प्रयोगाला मनोहरी सिंग आणि कर्सी लॉर्ड सारख्या दिग्गज अरेंजर्सच्या मदतीने परफेक्शन मिळालं.

1960 च्या दशकात हिप्पी कल्चर शिगेला पोहोचल होतं आणि हे कल्चर भारताच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं होत. हा बदल नेमका हेरला तो आरडी बर्मन यांनी. त्यांनी भारतीय सिनेसृष्टीला लॅटिन अमेरिकन साल्सा, फ्लेमेन्को आणि सांबा तसेच आफ्रिकन लोकसंगीताची ओळख करून दिली. पंचमदांच्या संगीतात पाश्चात्य शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत तर होतंच पण त्याचबरोबर अरबी संगीतही होतं. प्रसिद्ध जॅझ गायक लुई आर्मस्ट्राँगला आपला आदर्श मानणाऱ्या आरडी बर्मन यांनी जॅझ व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक रॉक, फंक, ब्राझीलचे प्रसिद्ध बोसा नोव्हा संगीत आपल्या गाण्यात आणलं. 1987 मध्ये, प्रसिद्ध लॅटिन अमेरिकन संगीतकार जोस फ्लोरेस यांच्यासोबत त्यांनी 'पँटेरा' नावाचा एक अल्बम देखील रिलीज केला.

बर्मन यांनी बंगाली लोकसंगीत आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या सर्व पैलूंसोबत आपल्या देशातील सांस्कृतिक विविधतेचा पूर्ण आदर केला. नवनवे प्रयोग केले. 1981 मध्ये आलेल्या 'कुदरत' या चित्रपटात त्यांनी किशोर कुमार आणि परवीन सुलताना यांना 'हमे तुमसे प्यार कितना' हे पारंपारिक ठुमरी शैलीतील गाणं गायला लावलं.

पंचमदा यांनी जे काही नवं ऐकलं, ते ते संगीतबद्ध केलं. सँडपेपर, बांबू, कप, ताट, शंख, कंगवा, काचेच्या बाटल्या आणि पुठ्ठा-लाकडी पेटी या गोष्टींचाही त्यांनी वाद्य म्हणून वापर केला. 'शोले'मध्ये तर पंचम दा यांनी गायलेल 'मेहबूबा, मेहबूबा' हे गाणं एका ग्रीक गाण्यापासून प्रेरित होतं. या गाण्यात पाण्याने भरलेल्या बिअरच्या बाटल्यांमधून निघणाऱ्या आवाजाचा वापर करण्यात आला होता.

1980 मध्ये बर्मन यांनी आशा भोसले यांच्याशी लग्न केले . त्यांनी एकत्र अनेक हिट गाणी रेकॉर्ड केली आणि अनेक लाईव्ह परफॉर्मन्सही सादर केले. परंतु, त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस ते एकत्र राहिले नाहीत. नसीर हुसेन आणि देव आनंद सारखे निर्माते त्यांच्या चित्रपटातल्या गाण्यांसाठी आरडी बर्मन यांना पहिल्यांदा निव़डायचे.

पंचमदा यांचं वयाच्या 54 व्या वर्षी, 4 जानेवारी 1994 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यावेळी ते विधू विनोद चोप्रा यांच्या '1942 अ लव्ह स्टोरी'ला संगीत देत होते. त्यांना मरणोत्तर 40 व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये त्यांचा तिसरा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1960 ते 1990 च्या दशकापर्यंत, बर्मन यांनी 331 चित्रपटांसाठी संगीत रचना केल्या, ज्यामुळे त्यांच्या रचनांनी संगीतसृष्टीला अतिशय सुरेख गाणी बहाल केली. बर्मन यांच्या 331 प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी 292 हिंदीमध्ये, 31 बंगालीमध्ये, 3 तेलुगूमध्ये, 2 तमिळ आणि उडियामध्ये आणि 1 मराठीमध्ये होते. बर्मन यांनी हिंदी आणि मराठीमध्ये 5 टीव्ही मालिकांसाठीही संगीत दिले. 27 जून 2016 रोजी त्यांच्या 77 व्या वाढदिवसाच्या वर्धापन दिनानिमित्त, गुगलने त्यांच्या भारतीय होम पेजवर आरडी बर्मन यांचे डूडल बनवले होते.

आज कित्येक वर्षांनंतरही त्यांच्या संगीतामध्ये कमालीची ताकद आहे. त्यांच्या सुरांनी नव्या पिढीचे सुद्धा पाय थिरकतील. पाश्चात्य संगीताचा खोलवर प्रभाव असूनही आरडी बर्मन यांच्या गाण्यात हिंदुस्थानी आत्मा होता. आजच्या पिढीतले ए आर रहमान असेल अमित त्रिवेदी असेल किंवा मग इतर तरुण उद्योन्मुख संगीतकार. या सर्वांसाठी एक आदर्शमय उदाहरण पंचमदांनी तेव्हाच निर्माण केले आहे.

भारतीय सिनेसृष्टीत पंचमदांच योगदान अद्वितीय राहील...