CM Hemant Soren Disqualification : हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यपालांकडे केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगानं राज्यपालांना पत्र पाठवलं असून सोरेन यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली आहे. अशा परिस्थितीत अंतिम निर्णय राज्यपालच (Jharkhand Governor) घेतात. राज्यपालांच्या निर्णयानंतरच सोरेन यांचं विधानसभेचं सदस्यत्व रद्द होणार की, नाही? हे स्पष्ट होईल. दरम्यान, सत्तेत असताना सोरेन यांनी स्वतःच्या नावावर खाणीचा पट्टा केला होता. त्यामुळेच त्यांचं आमदारकी सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केंद्रीय निवडणूक आयोगानं केल्याची माहिती मिळत आहे. 


झारखंडचे (Jharkhand) मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand CM Hemant Soren) यांचे सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भातील शिफारस पत्र केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यपालांना पाठवलं आहे. सोरेन यांनी स्वतःच्या नावावर खाणीचा पट्टा घेतल्या प्रकरणी आयोगानं ही शिफारस केली आहे. राज्यपाल (Governor) रमेश बैस (Governor of Jharkhand Ramesh Bais) दुपारी 12 वाजता दिल्लीहून निघतील आणि दुपारी 2 वाजता रांचीला पोहोचतील. त्यानंतर अंदाजे तीन वाजेपर्यंत राज्यपालांचा निर्णय राजपत्रात प्रसिद्ध केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


प्रकरण नेमकं काय? 


हेमंत सोरेन यांनी स्वत:ला खाण लीज वाटप केल्याचा आरोप भाजपनं केला आहे. यानंतर भाजपनं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. भाजपनं हेमंत सोरेन यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी लोकप्रतिनिधी आणि लाभ कार्यालय कायदा, 1951 च्या कलम 9A चा हवाला देऊन केली होती. कारण हेमंत सोरेन यांच्याकडे राज्य मंत्रिमंडळातील खाण-वनमंत्रीपद आहे. 


माहिती अधिकार कार्यकर्ते शिवशंकर शर्मा यांनी खाण घोटाळ्याची सीबीआय (CBI) आणि ईडीकडे (ED) चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या दोन जनहित याचिका दाखल केल्या होत्या. हेमंत सोरेन यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्टोन क्युरी माईन्स स्वतःच्या नावावर घेतल्याचा आरोप आहे. शेल कंपनीत गुंतवणूक करून मालमत्ता मिळवल्याचाही आरोप त्यांच्यावर केला जात आहे. 


झारखंडच्या राजकारणातही भूकंप?


झारखंडमध्ये सरकार चालवत असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चानंही आता हेमंत सोरेन यांच्या पर्यायाची चर्चा केली आहे. मुख्यमंत्री पद सोरेन कुटुंबाकडेच राहणार असल्याचं मानलं जात आहे. हेमंत यांच्यानंतर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांची वर्णी मुख्यमंत्रीपदी लागू शकते, असा दावा भाजपनं केला होता.