CM-PM Meet : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. विशेष बाब म्हणजे एकनाथ शिंदे सहकुटुंब पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी निघाले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांची पत्नी असे सर्वजण उपस्थित आहेत. भेटीला रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांना भेटीविषयी विचारलं असता ते म्हणाले की, "ही सदिच्छा भेट आहे. आल्यावर भेटतो तुम्हाला."


अधिवेशनाच्या काळात पंतप्रधान मोदींसोबत खासदारांच्या कौटुंबिक भेटी होत असतात. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटुंब पंतप्रधानांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत.  पंतप्रधान मोदी यांच्या 7 जनकल्याण इथल्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. तर संध्याकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट एकनाथ शिंदे घेणार आहेत. दुपारी चार वाजता ही बैठक होईल.


राजकीय गदारोळात मुख्यमंत्र्यांच्या कौटुंबिक भेटीची चर्चा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल (21 जुलै) दहाच्या सुमारास अचानक मुंबईहून दिल्लीत दाखल झाले. आठवड्याभरातील मुख्यमंत्र्यांची ही दुसरी दिल्लीवारी आहे. NDA बैठकीपाठोपाठ तीन दिवसात एकनाथ शिंदे पुन्हा पंतप्रधानांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा नियोजित दौरा नाही. ही कौटुंबिक भेट आहे. त्यामुळे राजकीय गदारोळात मुख्यमंत्र्यांच्या कौटुंबिक भेटीची सध्या चर्चा रंगली आहे.


एनडीए बैठकीसाठी एकनाथ शिंदे 18 जुलैला दिल्लीत


याआधी मंगळवारी 18 जुलै रोजी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते. त्यावेळी भाजपने आयोजित केलेल्या एनडीएच्या बैठकीसाठी ते दिल्लीला गेले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती. त्यानंतर तीनच दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आहेत. आज दुपारी एकनाथ शिंदे अमित शाह यांची भेट घेणार आहेत.


अमोल मिटकरी यांचं ट्वीटने चर्चांना उधाण


दरम्यान एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. अजित पवारांची राजकारणात काम करण्याची स्टाईल, त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि त्यांची कार्यशैली त्यातून दाखवण्यात आली आहे. या व्हिडीओला 'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व' असं कॅप्शनही त्यांनी दिलं आहे. अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने खास अंदाजात अमोल मिटकरी यांनी अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमोल मिटकरी यांच्या या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.


VIDOE : Delhi Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब दिल्लीत, आठवड्याभरात दुसरा दिल्ली दौरा ABP Majha