शिमला : हिमाचल प्रदेशात सत्ता मिळवूनही भाजप संभ्रमावस्थेत आहे. कारण, 'गड आला पण सिंह गेला', अशी परिस्थिती भाजपची झाली आहे. हिमाचल प्रदेशातील भाजपचा सर्वात मोठा चेहरा असलेले मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेम सिंह धूमल यांचा पराभव झाला आहे.

काँग्रेस उमेदवाराकडून प्रेम सिंह धूमल यांचा पराभव झाला. निडणुकीपूर्वीच भाजपने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून माजी मुख्यमंत्री असलेल्या प्रेम सिंह धूमल यांचं नाव जाहीर केलं होतं. हिमाचल प्रदेशातील भाजपचा ते सर्वात मोठा चेहरा समजले जातात.

हिमाचल प्रदेशचे भाजपचे प्रदेशाध्यक्षही पराभवाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ज्यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली तेच उमेदवार हारल्यामुळे मुख्यमंत्री कुणाला करायचं असा प्रश्न भाजपसमोर असेल.

केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा हे हिमाचल प्रदेशचे आहेत. मात्र त्यांचं नाव स्पर्धेत असण्याची शक्यता कमीच असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्यामुळे हिमाचलमध्ये सत्ता येऊनही हा तिढा सोडवण्याचं भाजपसमोर आव्हान असेल.