CM Arvind Kejriwal on ₹2,000 notes withdrawn: वापरात असूनही नजरेतून हद्दपार झालेल्या 2 हजार रुपयांच्या नोटेला कायमचा पूर्णविराम देण्याचा निर्णय मोदी सरकारकडून आज जाहीर करण्यात आला. देशात 2016 मध्ये करण्यात आलेल्या नोटबंदीच्या भयकंर अनुभवामुळे या निर्णयावर विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा बालिशपणाचा निर्णय असल्याची प्रतिक्रिया दिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेलक्या शब्दात प्रहार केला आहे. केजरीवाल यांनी ट्विट करून हल्लाबोल केला आहे. 


केजरीवाल आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 2000 ची नोट आणून भ्रष्टाचार थांबेल, असे प्रथम सांगितले. आता ते म्हणत आहेत की 2000 ची नोट बंद केल्याने भ्रष्टाचार संपेल, म्हणूनच आम्ही म्हणतो, पंतप्रधान शिक्षित असावेत. निरक्षर पंतप्रधानांना कोणीही काहीही म्हणू शकतो, त्याला समजत नाही. याचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे.






दुसरीकडे, भारतीय रिझर्व्ह बँकेने 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन हजारांच्या नोटा 30 सप्टेंबर 2023 पर्यंत त्या बदलून घेण्यास सांगितले आहे. दरम्यानच्या काळात 2,000 रुपयांच्या नोटा कायदेशीर वापरात असतील. आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या “स्वच्छ नोट धोरण” च्या अनुषंगाने ₹ 2000 मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ₹ 2000 च्या नोटा कायदेशीर निविदा राहतील. नोटबदलीचा कार्यक्रम कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आणि जनतेला पुरेसा वेळ देण्यासाठी, सर्व बँकांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ₹ 2000 च्या नोटांसाठी ठेव आणि/किंवा विनिमय सुविधा उपलब्ध करून द्यावी.


एकावेळी फक्त 2 हजार रुपयांच्या नोटा 20 हजार रुपयांपर्यंत बदलू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर 2000 हजार रुपयांची नोट चलनात आली. नोटाबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या.


इतर महत्वाच्या बातम्या