Cloudburst in Himachal Pradesh And Uttarakahnd: नवी दिल्ली : निसर्ग कोपतो तेव्हा काय होतं, हे वायनाडच्या (Wayanad) घटनेनं दाखवून दिलं. आता वायनाडपाठोपाठ हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) ढगफुटी झाल्यानं हाहाःकार माजला आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी आणि कुल्लूमध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आतापर्यंत 30 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. शिमल्यातील हायड्रो प्रोजेक्टजवळ गुरुवारी पहाटे ढग फुटल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं याला दुजोरा दिला आहे. 


दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये पावसामुळे विध्वंस झाल्याचं पाहायला मिळत आहे. मान्सूननं देशाच्या मोठ्या भागांत धुमाकूळ घातला आहे. बुधवारी (31 जुलै) दिल्लीत विक्रमी पाऊस झाला, आजही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि शिमला जिल्ह्यांजवळ ढगफुटी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात सुमारे 30 लोक बेपत्ता झाले आहेत. तर, 4 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तराखंडच्या टिहरी गढवालमध्येही ढगफुटीची घटना घडली आहे.  




कुल्लू आणि मंडीमध्ये ढगफुटीमुळे हाहाःकार 


हिमाचल प्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये ढगफुटीमुळे मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. कुल्लू आणि मंडी जिल्ह्यात ढग फुटण्याच्या घटना घडल्या. कुल्लूच्या रामपूर भागातील समेज येथील पॉवर प्लांट प्रकल्पातील अनेक लोक ढग फुटीनंतर बेपत्ता आहेत. 20 हून अधिक घरं जमीनदोस्त झाली असून अनेक वाहनं वाहून गेली आहेत, परिसरातील शाळाही पुरात वाहून गेल्या आहेत. मंडी जिल्ह्यात ढगफुटीनंतर एक मृतदेह सापडला आहे, तर अनेकजण बेपत्ता आहेत. मंडी जिल्हा प्रशासनानं हवाई दलाला बचावासाठी सतर्क केलं आहे. घटनास्थळी उपस्थित स्थानिक प्रशासन मदतकार्यात गुंतलं आहे.




उपायुक्त अनुपम कश्यप यांनी सांगितलं की, घटनेची माहिती मिळताच डीएसआरएफ, पोलीस दल आणि बचाव पथक घटनास्थळी पाठवण्यात आलं. ते म्हणाले की, ढगफुटीमुळे प्रभावित झालेल्या भागातून 19 लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे.


डीसी अनुपम कश्यप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी रस्ते बंद झाल्यामुळे बचाव पथक उपकरणांसह दोन किलोमीटर चालत घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. अधिकारी आणि बचाव पथकातील सदस्यांना ढगफुटीमुळे बाधित झालेल्या लोकांना सर्वतोपरी मदत करण्यास सांगण्यात आलं आहे.


घर, पूल आणि जेसीबी मशीन वाहून गेले


शिमला रायपूरच्या झाकरीमध्ये बुधवारी रात्री पावसामुळे घानवी आणि समेळ खड्ड्यामध्ये ढगफुटीमुळे पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. घणवी येथे ढगफुटीमुळे आलेल्या पुराची तपासणी केली असता ढगफुटीमुळे 5 घरं, 2 फूट पूल, शाळा इमारत, रुग्णालय, वीज प्रकल्पाचे विश्रामगृह, एक जेसीबी मशीन आणि तीन छोटी वाहनं वाहून गेली आहेत. ढगफुटी झाल्यानंतर घरं उध्वस्त झाली. याशिवाय आणखी 10 ते 12 जण बेपत्ता असल्याची भीती आहे. प्रशासनाचे लोक घटनास्थळी दाखल झाले आहेत. एनडीआरएफ, स्थानिक पोलीस दल आणि स्थानिक लोक बचाव कार्यात गुंतले आहेत.


मंडईत ढगफुटीमुळे एकाचा मृत्यू


एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील पधार उपविभागातील थलतुखोड येथेही ढगफुटी झाली आहे. तेथून एकाचा मृतदेह सापडला आहे, तर 11 जण बेपत्ता आहेत. एनडीआरएफ-एसडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अनेक घरांचंही नुकसान झाल्याचं वृत्त आहे. मंडीचे डीसी अपूर्व देवगण यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी पाठवण्यात आली आहे.