देहरादून : उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून चारधाम यात्रेकरुंनाही हवामान खात्याकडून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.


ढगफुटीमुळे महामार्गाचा काही भाग गेला वाहून

घनसालीमध्ये शनिवारी झालेल्या ढगफुटीमुळे अनेक घरं वाहून गेली आहेत. त्यामुळे जनजीवनही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. राजधानी देहरादूनमध्ये मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून घनसालीमध्ये महामार्गाचा काही भाग वाहून गेल्यामुळे शेकडो यात्रेकरु अडकले आहेत.

बिलकेश्वरमध्ये 200 यात्रेकरु अडकले

 

घनसालीसोबतच किरेथ, श्रीकोट, राजगाव आणि कोठीयाड यासारख्या भागातील अनेक गावं ढगफुटीमुळे सर्वाधिक प्रभावित झाली आहेत. घनसाली मार्गे केदारनाथला जाणाऱ्या महामार्गाचे 15 ठिकाणी नुकसान झाल्याने जवळपास 200 हून अधिक यात्रेकरु बिलकेश्वर मंदिरामध्ये अडकले आहेत.

15 वर्षांचा विद्यार्थी गेला वाहून

 
घनसालीच्या पोलीस आयुक्त पवनकुमार यांनी सांगितले की, या ढगफुटीनंतर आलेल्या महापुरात विपुल नावाचा 15 वर्षीय शाळकरी विद्यार्थी वाहून गेला आहे.

दिवसा झालेल्या ढगफुटीमुळे नुकसान टळले

 

दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा प्रशासनासोबतच एनडीआरएफची टीम मदत आणि पुनर्वसनासाठी घटनास्थळी दाखल झाली आहे. ही घटना रात्री ऐवजी दिवसा घडल्याने नुकसान कमी झाल्याचे म्हटले जाते. तसेच या घटनेमुळे जिल्हा स्थानिक प्रशासनाचे सर्व दावे फोल ठरले आहेत.