नवी दिल्ली: शनिवारी दिल्ली सरकारने सर्वच शाळांमध्ये पालक सभेचे आयोजन केले होते. मात्र या सभेनंतर एका 11 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली आहे.

 

पश्चिम दिल्लीच्या ख्याला भागातील करिश्मा या 11 वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. शाळेने तिच्या घरच्यांकडे केलेल्या तक्रारीने घाबरून, तिने आत्महत्या केल्याचे तिच्या पालकांचे म्हणणे आहे.

 

करिश्माची आई शाहजहा काल सकाळी पालक सभेला जात होती. त्यावेळी तिने करिश्माला सोबत येण्यास सांगितले. मात्र, ती या सभेला जाण्यास तयार नव्हती. तिच्या पालकांनी जर त्यावेळीच यामागचे कारण विचारले असते, तर तिचा जीव वाचला असता.

 

करिश्मा ख्याला भागातील सातवीत शिकणारी विद्यर्थीनी आहे. तिच्या पालकांच्या मते, शाळेतील शिक्षक यापूर्वीही विद्यार्थ्यांना मारत होते. मात्र, याची तक्रार कधीही शाळेकडे केली नाही. यामुळेच तिचा जीव गेल्याचे त्यांनी सांगितले.

 

दिल्ली सरकारच्या वतीने शनिवारी पहिल्यांदाच सर्व सरकारी शाळांमध्ये पालक सभेचे आयोजन केले होते. दिल्ली सरकार या पालक सभेवरून स्वत: ची पाठ थोपटून घेत आहे, तर दुसरीकडे या दुर्दैवी घटनेने विरोधकांनी केजरीवालांना लक्ष केले आहे.

 

ख्याल परीसरातील ही घटना, पालक सभेसाठी मोठमोठ्या जाहिरातबाजीचा परिणाम आहे. कारण, राज्य सरकार शिक्षकांच्या चुकांकडे लक्ष देण्यापेक्षा जाहिरातबाजीमध्येच मशगुल आहे. असा आरोप काँग्रेस अध्यक्ष अजय माकन यांनी केला आहे.

 

तिच्या पालकांनी शाळा प्रशासनाला या प्रकरणी दोषी धरले असून पोलिसांच्या मते, तिने पालकांनी रागावल्याने आत्महत्या केल्याचे सांगितले. दरम्यान, या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी या घटनेच्या चौकशीसाठी दंडाधिकाऱ्याची चौकशी समिती स्थापन केली आहे.