Clashes In JNU : JNU म्हणजेच, पंडित जवाहरलाल नेहरु विद्यापिठात विद्यार्थी संघटनांमध्ये पुन्हा एकदा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. या वादात अनेक विद्यार्थ्यांना गंभीर दुखापतही झाली आहे. जेएनयूमध्ये ABVP आणि डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत दोन्ही गटांतील विद्यार्थ्यांना दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. पण हा वाद नेमका कोणत्या कारणानं झाला, याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसेच ज्या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये वाद झाला त्या संघटनांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचं सत्र सुरु आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 


जेएनयू छात्र संघाच्या अध्यक्षा आणि विद्यार्थी फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेत्या आयशी घोष यांनी मारहाणीच्या घटनेबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे. दोन्ही संघटनांच्या वतीनं एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप लावले जात आहेत. आयशी घोष यांनी या घटनेसाठी एबीव्हीपी (ABVP) जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. अशातच एबीव्हीपीच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, जेएनयूच्या स्टुडंट अॅक्टिव्हिटी रुममध्ये बैठक जारी होती. यादरम्यान, रविवारी रात्री जवळपास 9 वाजून 45 मिनिटांनी डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी तिथे पोहोचले आणि उपस्थितांना मारहाण करण्यास सुरुवात केली. 


जेएनयू विद्यापीठात घडलेल्या या मारहाणीच्या घटनेबाबत दिल्लीतील वसंत कुंज पोलीस स्थानकात ABVP च्या वतीनं तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेबाबत पोलिसांचं म्हणणं आहे की, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. दरम्यान, अद्याप या प्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करण्यात आलेला नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस याप्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. 


मारहाणीच्या घटनेनंतर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेत्या आणि जेएनयू विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा आयशी घोष यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, "एबीव्हीपीच्या गुंडांनी जेएनयूमध्ये आज हिंसा पसरवण्यात आली आहे. या आरोपींनी विद्यार्थ्यांसोबत मारहाण केली आणि विद्यापिठाच्या आवारात लोकशाहिला बाधित केलं. आताही जेएनयू प्रशासन शांत राहणार? यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही?" आयशी घोष यांनी ट्विटरवर या हाणामारीच्या घटनेसंदर्भातील फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये काही विद्यार्थी दिसत आहे. ज्यांना गंभीर दुखापत झाल्याचंही दिसत आहे.